शिवरायांची पालखी मिरवणूक आणि साहसी खेळाची प्रात्यक्षिके
ठाणे: ठाणे महानगरपालिकेतर्फे सोमवार, १७ मार्च रोजी तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने, मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मिरवणूक काढण्यात आली.
शिवजयंतीनिमित्त ठाणे महापालिकेच्या वतीने तलावपाळी, टेंभी नाका, कोर्ट नाका, स्टेशन रस्ता, सिद्धिविनायक मंदिर, रंगो बापूजी गुप्ते चौक या मार्गावर मिरवणूक काढण्यात आली.
सर्वप्रथम, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी यांनी मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर, पालखीत विराजमान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस वंदन करून मिरवणुकीस प्रारंभ झाला. या मिरवणुकीत, घोडेस्वार, लेझीम पथक, शिवकालीन खेळाचे प्रात्यक्षिक दाखवणारी पथके, बॅण्ड आदीचा समावेश होता. मिरवणुकीदरम्यान, माजी उपमहापौर पल्लवी कदम, माजी नगरसेवक पवन कदम, माजी नगरसेवक सुधीर कोकाटे, उपायुक्त शंकर पाटोळे, सहाय्यक आयुक्त सोपान भाईक आदी उत्सवात सहभागी झाले.
मिरवणूक मार्गात, कोर्ट नाका येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, टेंभी नाका येथे धर्मवीर आनंद दिघे आणि तलावपाळी येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मिरवणुकीत काळभैरव क्रीडा मंडळ, जय हनुमान क्रीडा मंडळ यांच्या कार्यकर्त्यांनी शिवकालीन खेळाची प्रात्यक्षिके सादर केली. मिरवणुकीची सांगता, तलावपाळी येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून करण्यात आली.
शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने, ठाणे महापालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्याप्रसंगी, माजी नगरसेवक संजय वाघुले, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, उपायुक्त मिनल पालांडे, विधी अधिकारी मकरंद काळे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.