चकाचक रस्त्यांनी रोखली सीसी टिव्ही कॅमेऱ्यांची ‘नजर’

वाहिन्यांमुळे रस्त्यांची चाळण होण्याची भीती, मंजुरी रखडली

ठाणे: गुन्हेगारावर नजर ठेवण्यासाठी ठाणे पोलिसांकडून शहरातील मोक्याच्या ९१७ ठिकाणी बसविण्यात येणाऱ्या तीन हजारपेक्षा जास्त सीसीटिव्ही कॅमेऱ्यांसाठी उभारण्यात येणाऱ्या खांब उभारणीस ठाणे महापालिकेने परवानगी दिली आहे. परंतु कॅमेऱ्यांच्या वाहिनीसाठी चकाचक रस्ते खोदावे लागणार असल्यामुळे पालिका प्रशासनाने या कामाला मात्र अजूनही परवानगी दिली नाही.

ठाणे पोलिस आयुक्तालयातील १९९७ ठिकाणी ६०५१ इतके सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्याच्या प्रस्तावाला राज्य शासनाने नुकतीच मान्यता देत प्रकल्पासाठी ५७० कोटी ३० लाखांचा निधी मंजुर केला आहे. यानुसार ठाणे ते दिवा शहरात ३,१६३, भिवंडी शहरात १,३४७ आणि उल्हासनगर ते बदलापूर १,५४१ असे एकूण ६०५१ सीसीटिव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. यातील ठाणे शहरातील कॅमेऱ्यांच्या जोडणीसाठी वाहिन्या टाकाव्या लागणार आहेत. त्यासाठी शहरातील ३०० किमीचे रस्ते खोदण्यास परवानगी देण्याबाबत ठाणे पोलिसांनी पालिका प्रशासनाकडे नुकत्याच झालेल्या एका बैठकीत मागणी केली. परंतु ठाणे शहरात कोट्यावधी रुपये खर्चून अनेक रस्त्यांच्या नुतनीकरणाची कामे नुकतीच करण्यात आली आहेत. नवेकोरे रस्ते खोदल्यास त्या रस्त्यांची दुरावस्था होऊ शकते. त्यामुळे खोदकामाच्या परवानगीस नकार देत पालिका प्रशासनाने विद्युत खांबांवरून उन्नत किंवा पदपथाजवळील भागातून कॅमेऱ्यांच्या वाहिन्या टाकण्याचा पर्याय दिला होता. पालिकेच्या भूमिकेमुळे पेचात सापडलेल्या ठाणे पोलिसांनी त्यावर विचार सुरू केला होता. असे असतानाच, ठाणे पोलिसांनी सीसी टिव्ही कॅमेऱ्यांकरीता आवश्यक असलेले खांब उभारणीसाठी पालिकेकडे परवानगी मागितली होती. त्यास पालिकेने परवानगी देताच, ठाणे पोलिसांनी कॅमेऱ्यांकरिता आवश्यक असलेले खांब उभारणीचे काम सुरू केले आहे. असे असले तरी कॅमेऱ्यांच्या वाहिनीसाठी नव्याकोऱ्या रस्त्यांची खोदाई करावी लागणार असल्यामुळे पालिका प्रशासनाने या कामाला मात्र अद्याप हिरवा कंदील दाखविलेला नाही. यामुळे सीसीटिव्ही कॅमेऱ्यांकरीता खांब उभारणीच्या कामाला प्रत्यक्षात सुरूवात झाली असली तरी त्यासाठी आवश्यक असलेले वाहीन्यांचे काम अद्याप सूरू होऊ शकलेले नसल्याचे चित्र आहे.

ठाणे, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर ही शहरे ठाणे पोलिस आयुक्तालय क्षेत्रात येतात. या शहरांमध्ये एकूण ३५ पोलीस ठाणे आहेत. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी शहरात पोलिसांची पथके, गुन्हे अन्वेषण शाखेचे कर्मचारी गस्ती घालत असतात. लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांचे मनुष्यबळ अपुरे आहे. त्यामुळे निरनिराळ्या गुन्ह्यांना पायबंद बसावा तसेच घडलेल्या गुन्ह्यांचा शोध घेता यावा, यासाठी ठाणे पोलिसांकडून संपुर्ण आयुक्तालय क्षेत्रात ६०५१ इतके सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी सांगितले.