बारामतीत शिंदे-पवार गटात ठिणगी; धग मात्र कल्याणात!

कल्याणमध्ये राष्ट्रवादी विरोध करणार, परांजपे यांचा इशारा

ठाणे: बारामती लोकसभा मतदार संघात शिवसेना शिंदे गट विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात वणवा पेटला असून त्याची झळ कल्याण लोकसभा मतदार संघाला बसण्याची शक्यता आहे. बारामती येथिल वाद संपवा अन्यथा कल्याण लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी विरोधात उतरेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिला आहे. त्यामुळे महायुतीमध्ये सर्व काही आलबेल नाही, अशी चर्चा सुरु झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार आनंद परांजपे यांनी पत्रकार परिषदेत माजी मंत्री शिवसेना शिंदे गटाचे विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात शिवराळ भाषेत आरोप करून बारामती लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले होते. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय शिवतारे यांना वेळीच आवर घालावा, अन्यथा कल्याण लोकसभा मतदार संघातील शिवसेना उमेदवाराला निवडणूक जड जाईल असा इशारा दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वाभिमानी कार्यकर्ते त्यांच्या नेत्यांच्या विरोधातील शिवराळ भाषा सहन करणार नाहीत. कल्याण लोकसभा मतदारसंघात वेगळा निकाल लागू शकतो, असा इशारा देतानाच महायुतीमधील समन्वय टिकून राहावा, याकरिता मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी वाचाळ वीरांना समज द्यावी, अशी विनंती श्री परांजपे यांनी केली आहे.