सखी महोत्सवातून ठाण्यात शिंदे गटाचे शक्ती प्रदर्शन

ठाणे : ठाणे लोकसभेचा उमेदवार भाजपचा कि शिवसेनेचा हे अद्याप जाहीर झाले नसले तरी, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या महिला मात्र सखी महोत्सवाच्या माध्यमातून आपले शक्तिप्रदर्शन करणार आहेत. या महोत्सवाला स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार असून या निमित्ताने महिला मतदारांशी संवाद साधला जाणार आहे. या महोत्सवाला ५० हजारांहून अधिक महिला सहभागी होतील, असा दावा आयोजकांकडून करण्यात आला आहे.

महायुतीमधील ठाणे लोकसभेचा दावा अद्याप सुटलेला नाही. या मतदार संघावर अजूनही दोन्ही पक्षाचा दावा असून हा मतदार संघ शिंदेच्या शिवसेनेलाच जाणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे अद्याप या ठिकाणी उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. मात्र त्यापूर्वीच उबाठा पक्षाचे उमेवार राजन विचारे यांनी आपला प्रचार देखील सुरु केला असून त्यांनी भेटीगाठी देखील सुरु केल्या आहेत. महायुतीचा उमेदवारच अद्याप जाहीर करण्यात आला नसल्याने शिवसेना किंवा भाजपकडून प्रचाराला सुरुवात करण्यात आलेली नाही.

ठाण्यातील टीप टॉप प्लाझा या ठिकाणी महायुतीचा एक मेळावा आयोजित करण्यात आला होता. मध्यंतरी महिला बचत गटांना अनुदान वाटप करण्यावरून शिवसेनेवर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात आली होती. त्यानंतर आता थेट ठाण्यातील हायलॅन्ड या ठिकाणी सखी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्याला ५० हजारांपेक्षा अधिक महिला हजर राहणार असल्याची माहिती महिला ठाणे जिल्हा प्रमुख मीनाक्षी शिंदे यांनी दिली आहे.

निवडणूक काळात महिला मतदारांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. यामुळेच महिला मतदारांवर लक्ष केंद्रित करून या महोत्सवाचे आयोजन केल्याचे बोलले जात आहे.