नवी मुंबई : ऐरोली विधानसभेत शिंदे गट देखील सांगली पॅटर्न राबवत असल्याची चर्चा सुरु झाली असून या ठिकाणी अपक्ष उमेदवार विजय चौगुले यांच्यासाठी शिंदे गटाचे सर्व माजी नगरसेवक उघड-उघड प्रचार करताना दिसत आहेत.
नवी मुंबईतील बेलापूर आणि ऐरोली या दोन्ही जागा महायुतीतर्फे भाजपा लढवत आहे. मात्र या दोन्ही जागांवर शिंदे समर्थकांनी बंडखोरी केली आहे. या बंडखोरांवर शिंदे गटाकडून कोणतीही कारवाई झाली नसल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बंडखोरांना छुपा पाठिंबा आहे का?अशी चर्चा सुरू होती. मात्र चार दिवसांपूर्वी बेलापूरमध्ये खासदार नरेश म्हस्के यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन मंदा म्हात्रे यांना विजयी करण्याचे आवाहन केले. त्यानंतर शिंदे गटाचे माजी नगरसेवक मंदा म्हात्रे यांच्या प्रचारात दिसू लागले. मात्र यावेळी ऐरोली विधानसभाबाबत म्हस्के यांनी कुठलाच निरोप न दिल्याने शिंदे गटाच्या माजी नगरसेवकांना विजय चौगुले यांच्या पाठीमागे राहण्याचे अप्रत्यक्ष संकेतच मिळाले. त्यामुळे रविवारपासून शिंदे गटाचे सुरेश कुलकर्णी, शिवराम पाटील, विलास भोईर यांसह अनेक माजी नगरसेवकांनी विजय चौगुले यांचा उघड-उघड प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शिंदे गटाची विजय चौगुले तसेच माजी नगरसेवक यांना मिळालेली मोकळीक पाहता ऐरोली विधान सभा क्षेत्रात भाजप उमेदवार गणेश नाईक यांना मात देण्यासाठी सांगली पॅटर्न राबवला जात असल्याचे स्पष्ट होत आहे.