पालघर जिल्हा परिषदेत शिंदे गट-भाजपची सत्ता

पालघर: पालघर जिल्हा परिषदेत सत्तापरिवर्तन होऊन आता बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप यांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली आहे. तर महाविकास आघाडीची सत्ता गेली आहे.

बाळासाहेबांची शिवसेना गटाचे प्रकाश निकम अध्यक्षपदी तर भाजपचे पंकज कोरे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून शिंदे गटाला महाराष्ट्रात पहिला जिल्हा परिषद अध्यक्ष मिळाला आहे.

पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक आज पार पडली. या निवडणुकीसाठी सकाळी अकरा वाजता अर्ज दाखल करण्यात आले. तर दुपारी तीनच्या सुमारास निकाल जाहीर झाला. पालघर जिल्हा परिषद महाविकास आघाडीच्या हाती होती. जुन्या शिवसेनेचे सर्वच्या सर्व 20 सदस्य शिंदे गटात सामील झाल्यामुळे पालघर जिल्हा परिषदेमध्ये उद्धव गटाचा एकही सदस्य उरलेला नाही. परिणामी बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप एकत्र आल्याने पालघर जिल्हा परिषदेत सत्ता परिवर्तन झाले. या निवडणुकीसाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि बाळासाहेबांची शिवसेना संपर्क प्रमुख आमदार रवींद्र फाटक आज पालघरमध्ये ठाण मांडून होते.

अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची बिनविरोध निवड

57 सदस्य असलेल्या पालघर जिल्हा परिषदेमध्ये 29 हा बहुमताचा आकडा आहे. जिल्हा परिषदेमध्ये शिंदे गटाचे 20 आणि भाजपचे 13 असे 33 सदस्य आहेत. त्यांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली आहे. दरम्यान बहुमत नसल्याने महाविकास आघाडीकडून अर्ज दाखल करण्यात आलेला नाही. त्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली आहे. निवडणुकीनंतर शिंदे गट आणि भाजपच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला.

पक्षीय बलाबल
शिवसेना (शिंदे गट) – 20
भाजप – 13
राष्ट्रवादी काँग्रेस – 13
माकप – 6
बविआ – 5

पालघर जिल्हा परिषदेतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सदस्य आणि पालघर जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून वसंत चव्हाण यांची बोईसर आणि विक्रमगड विधानसभा क्षेत्र आणि पालघर जिल्हाप्रमुखपदी पुनर्नियुक्ती करण्यात आली. या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटाला पालघर जिल्ह्यात मोठा फटका बसला आहे. पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे सदस्यांनीही वसंत चव्हाण यांच्यासह बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केल्याने शिंदे यांचही जिल्ह्यातील बळ अधिक वाढलं आहे. या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमावेळी आमदार आणि पालघर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख रवींद्र फाटक, जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे, माजी नगरसेवक राम रेपाळे आणि पालघर जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.