भाजपच्या आंदोलनाला बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून उत्तर
ठाणे: राज्यात भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्यात युती आहे. आगामी महापालिका निवडणुकीत या दोन्ही पक्षात युती होण्याची शक्यता असतानाही दिवा येथिल डम्पिंग ग्राउंडवरून दोन्ही पक्षात जुंपली आहे. दिवा येथे भाजप विरुद्ध बाळासाहेबांची शिवसेना यांनी एकमेकांविरोधात आंदोलन केल्याने त्यांच्यातील बेबनाव उघड झाला आहे.
भंडार्ली येथे डंपिंगसाठी तीन लाख ६५ हजार चौरस फूट जागा घेतल्यानंतरही, दिव्यात डंपिंग ग्राऊंड बंद करण्यास महापालिका प्रशासन टाळाटाळ करीत असल्याबद्दल, भाजपाच्या वतीने दिवा डंपिंग ग्राऊंडवर तीव्र आंदोलन करण्यात आले. डंपिंग ग्राऊंडकडे येणाऱ्या गाड्या अडवून निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. महापालिकेतील माजी गटनेते मनोहर डुंबरे, मिलिंद पाटणकर, नारायण पवार यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन झाले. त्यानंतर दहा दिवसांत दिव्यातील डंपिंग ग्राऊंड बंद न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
दिवा येथे अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या डंपिंग ग्राऊंडची क्षमता संपली आहे. मात्र, तेथे आणखी दररोज शेकडो गाड्या कचरा टाकला जात असल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली दिवावासियांनी डंपिंग विरोधात तीव्र आंदोलनही केले होते. या आंदोलनानंतर महापालिका प्रशासनाने डंपिंग ग्राऊंड बंद करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अजूनही ते बंद न केल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार निरंजन डावखरे यांच्या सुचनेनुसार आज तीव्र आंदोलन करण्यात आले. भाजपाचे कार्यकर्ते व शेकडो नागरिकांनी दिवा येथील डंपिंग ग्राऊंडकडे जाणाऱ्या गाड्या रोखण्यात आल्या. त्यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. तसेच महापालिकेच्या दिवा प्रभाग समितीचे प्रभारी सहायक आयुक्त फारूक शेख यांनी लवकरच येथील डंपिंग ग्राऊंड बंद करण्याचे आश्वासन दिले.
भाजपाची नौटंकी-मढवी
पूर्वी दिव्यात कचऱ्याचे ढीग उभे करण्यासाठी मदत करणारी मंडळी आज विरोधाला विरोध म्हणून आंदोलन करत आहेत. यांना नेमके काय साधायचे आहे असा सवाल माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांनी केला आहे.
२०१७ साली तत्कालीन पालकमंत्री स एकनाथ शिंदे यांनी दिव्याचे डम्पिंग बंद करण्याची घोषणा केली आणि त्यानंतर भंडार्ली येथे घनकचरा प्रकल्प मंजूर करून दिवेकरांना दिलेले वचन सत्यात उतरविले. हा प्रकल्प सर्वसाधारण सभेत मंजुरीस आला तेव्हा देखील याच मंडळींनी विरोध केला होता. भंडार्ली प्रकल्पावर ठाणे महानगर पालिकेने आतापर्यंत साडे पाच कोटीपेक्षा जास्त रुपये खर्च केले असून प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. भंडार्ली प्रकल्पासाठी महापालिकेतील तत्कालीन सत्ताधारी पक्षाने गावकऱ्यांशी चर्चा करुन मध्यस्थी केली होती. पालिकेने सदर प्रकल्पाच्या देखभालीसाठी नुकतीच निविदा काढली असून दिव्यातील डम्पिंग लवकरच बंद होऊन दिवेकरांना मोकळा श्वास घेता येणार आहे. दिव्याचे डंपिंग ग्राऊंड बंद व्हावे यासाठी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब, खासदार श्रीकांत शिंदे, माजी महापौर नरेश म्हस्के, माजी स्थायी समिती सभापती राम रेपाळे, दिव्यातील नगरसेवकांनी प्रयत्न केले होते. हीच बाब लक्षात घेऊन निव्वळ श्रेयासाठी काही मंडळी आंदोलन करुन केविलवाणा प्रयत्न करीत आहेत, असे रमाकांत मढवी यांनी म्हटले आहे.