शिंदे गटाचे कार्यकर्ते दिव्यात दहशत निर्माण करतात-वैशाली दरेकर

ठाणे: शिंदे गटाचे कार्यकर्ते सैरभर झाले आहेत. लोकांचं मत त्यांच्या विरोधात आहे. याची जाणीव त्यांना होऊ लागल्याने ते दिव्यात दहशतीचे वातावरण तयार करत आहेत, असा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेच्या कल्याण लोकसभा उमेदवार वैशाली दरेकर यांनी केला आहे .शिवसेनेचे विभाग प्रमुख नागेश पवार यांची भेट घेतल्यानंतर दरेकर यांनी हे वक्तव्य केले.

शिवसेना ठाकरे गटाच्या कल्याण लोकसभेच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी विभाग प्रमुख नागेश पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे दिवा शहर महिला संघटिका ज्योती पाटील, विकास इंगले व इतर शिवसैनिक उपस्थित होते.

नागेश पवार यांना शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी अनधिकृत बॅनरची तक्रार केली म्हणून मारहाण केली होती. याबाबत मुंब्रा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा देखील दाखल झाला आहे. या घटनेनंतर ठाकरेंची शिवसेना दिवा शहरात आक्रमक झाली असून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासन दबावाखाली असल्याचा आरोप केला आहे. मारहाण करणारे शिंदे गटाचे गुंड यांना वेळीच आवर घालावा अशी मागणी आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून होत आहे. दरम्यान विभागप्रमुख नागेश पवार यांच्या घरी वैशाली दरेकर यांनी भेट देत पक्ष नागेश पवार यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास दिला.