कळव्यात रंगणार शिमगोत्सव

ठाणे : होळी हा कोकणी चाकरमान्यांचा अस्मितेचा सण! मात्र, काही चाकरमान्यांना या सणाला कोकणात जाणे शक्य झाले नाही. त्यामुळेच गृहनिर्माण मंत्री ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी कोकणी संस्कृतीचे दर्शन ठाणेकरांना घडावे, या उद्देशाने येत्या रविवारी (दि. 3) कळवा येथे शिमगोत्सवाचे आयोजन केले आहे.

कळवा, खारीगाव पट्ट्यात मोठ्या संख्येने चाकरमानी वास्तव्यास आहेत. या चाकरमान्यांना आपल्या गावातील शिमगोत्सवाचा आनंद घेता यावा; तसेच, ठाणे शहरातील इतर कोकणी नागरिकांना कोकणातील शिमगोत्सवाची अनुभूती घेता यावी, या उद्देशाने हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

कळवा येथील सह्याद्री शाळेसमोर असलेल्या खारलँड मैदानामध्ये हा शिमगोत्सव दुपारी 4 ते रात्री 10 वेळेत साजरा करण्यात येणार आहे. होम रचण्यासह होळी पेटवणे आणि ढोल-ताशांचा गजरात पालखी नाचविण्याचाही कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे. या शिमगोत्सवासाठी रत्नागिरी तालुक्यातील उक्षी गावची ग्रामदेवता श्री देव सोमेश्वर, श्री देवी वाघजाई यांच्या पालख्या ठाणे शहरात येणार आहेत

या शिमगोत्सवासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा गृहनिर्माण मंत्री ना. डॉ. जितेंद्र आव्हाड, शहराध्यक्ष आनंद परांजपे, ज्येष्ठ नगरसेवक मिलींद पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे अरविंद मोरे यांनी सांगितले.