होळीआधीच डम्पिंगच्या नावाने शिमगा सुरू

ठाणे: होळीच्या सणाला दोन दिवस शिल्लक असतानाच कचऱ्याच्या प्रश्नावरून ठाण्यात शिमगा सुरु झाला आहे. वागळेच्या भर वस्तीत असलेल्या सी. पी. तलाव परिसरातील कचरा डम्पिंगला पुन्हा आग लागली आहे.

गेल्या तीन दिवसांत येथील कचर्‍याला दोन वेळा आग लागली असून धूर आणि दुर्गंंधीने ठाणेकरांना श्वास घेणे कठीण झाले आहे. दुसरीकडे कचरा टाकण्यासाठी कुठे जागाच सापडत नसल्याने पालिकेने दोन दिवसांपासून कचरा उचलण्यास बंद केले आहे. त्यामुळे शहरातील बाजारपेठा, सोसायट्यांचे आवार आणि अंतर्गत रस्त्यांवर कचर्‍याचे ढीग तयार झाले आहेत. त्यातूनही दुर्गंधी पसरत असल्याने आरोग्य बिघडण्याच्या भीतीने शहरवासीयांमध्ये प्रचंड नाराजी वाढत चालली आहे.

कचरा प्रश्न पेटणार असल्याचे लक्षात येताच पालिका प्रशासनाने चोवीस तासांत हा कचरा उचलण्यासाठी धावपळ सुरू केली आहे.
ठाणे शहरात दर दिवशी एक हजारहून अधिक टन कचरा जमा होतो. या कचर्‍याचे संकलन वागळे येथील सी. पी. तलाव परिसरात करून नंतर त्याची रवानगी कचरा विल्हेवाट प्रकल्प केंद्रात करण्याचे मुख्य नियोजन होते. पण डायघर आणि गायमुख येथील कचरा प्रकल्प त्यासाठी तोकडे पडत आहेत. त्यामुळे राज्य शासनाने दिलेल्या भिवंडी येथील आतकोलीच्या ३५ एकर भुखंडावर नवीन कचरा प्रकल्प उभारण्याची तयारी सुरू झाली आहे. पण या प्रकल्पामागे लागलेल्या अडचणी वाढतच आहेत. आता हा प्रकल्प निविदा प्रक्रीयेमुळे वादात आहे. हा वाद वाढत असताना दोन दिवसांपूर्वी सी. पी. तलाव परिसरातील कचर्‍याच्या ढिगार्‍याला आग लागली. मोठ्या प्रमाणात धुराचे लोट आणि दुर्गंधीने संपूर्ण परिसरला त्रास सहन करावा लागला.

सी. पी. तलावाचा पर्याय बंद झाल्यामुळे कचरा टाकायचा कुठे हा प्रश्न पालिकेसमोर उभा राहिला. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून जमा होणारा कचरा शहरात तसाच पडून आहे. विशेषतः ठाण्याची बाजारपेठ असलेल्या जांभळी येथे तसेच जवाहर बाग, खारकर आळी भागात मोठ्या प्रमाणात कचरा साठून ठेवला जात आहे. काही ठिकाणी कचऱ्याचा डोंगर उभा राहिला आहे. तर अनेक रस्ते कचर्‍याने व्यापून गेले आहेत. त्यामुळे सी.पी.नंतर खारकर आळी ठाण्याचे मिनी डंपिंग होण्याच्या मार्गावर आहे. यावरून येथील रहिवाशांमध्येही संताप व्यक्त होत आहे. यावर आज पालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी अधिकार्‍यांना तंबी देत चोवीस तासांत शहरातील रस्ता उचलून थेट आतकोली येथे टाकण्याचे आदेश दिले आहेत.

आगीमागे षडयंत्रांचा धूर
वागळे इस्टेट येथील सी. पी. तलाव परिसरात तयार झालेले डंपिंग हटवण्याची मागणी जुनी आहे. येथील रहिवाशांनीही वेळोवेळी आंदोलने केवली होती. लोकसभा, विधानसभा निवडणुकीला त्याचा फारसा फटका बसला नाही. पण महापालिका निवडणुकीत स्थानिक मुद्दा म्हणून सी. पी. तलाव पेट घेणार हे राजकारण्यांना माहित आहे. आतकोलीचा प्रकल्प लांबत असतानाच सी. पी. तलाव परिसरातील कचर्‍याला ‘ठिणगी’ कशी लागली असा संशयही विरोधी पक्षांकडून व्यक्त होत आहे.

डायघर प्रकल्प २०० मेट्रीक टनचा आहे. कळवा आणि मुंब्रा येथील कचर्‍याचे वर्गीकरण करून सध्या या ठिकाणी त्याची विल्हेवाट लागत आहे. तर शहरातील कचर्‍याचे वर्गीकरण करून ओला कचरा तातडीने गायमुख येथील १०० मेट्रीक टन क्षमता असलेल्या प्रकल्पाकडे रवाना करण्याचे आदेश दिले आहेत. तर उवर्रीत सुका कचरा आतकोली येथील क्षेपणभुमीवर हलवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चोवीस तासांत हा कचरा उचलण्याचे आदेश देण्यात आले असल्याने होळी आधी ठाणेकर मोकळा श्वास घेतील, असा विश्वास अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे.