दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या ‘श्री शिवराज अष्टक’ची सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे. ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’ या ऐतिहासिक चित्रपटानंतर ‘शेर शिवराज’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात अफजल खानाच्या वधाची कथा पाहायला मिळाणार आहे. चित्रपटाचं अनेक समीक्षकांनी कौतुक केलं आहे. पण यासोबत आता चर्चा सुरू आहे ती मराठी चित्रपटांना महाराष्ट्रातच प्राइम टाइम शोमध्ये स्थान न मिळण्याच्या मुद्द्याची. या मुद्द्यावर बरेच मराठी कलाकार व्यक्त होताना दिसतायत. त्यानंतर आता चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारा अभिनेता चिन्मय मांडलेकरनंही याच मुद्द्यावरून खंत व्यक्त केली आहे.
दिग्पाल लांजेकर यांचा काही काळापूर्वीच प्रदर्शित झालेला पावनखिंड हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान चालला. त्यानंतर आता त्यांचा ‘शेर शिवराज’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मात्र या चित्रपटाला चित्रपटगृहातील स्क्रिनिंगसाठी प्राइम टाइममध्ये स्थान मिळालेलं नाही. यावर ‘झी २४ तास’ला दिलेल्या मुलाखतीत चिन्मय मांडलेकर म्हणाला, “महाराजांच्या पराक्रमाची गाथा असलेल्या चित्रपटाला महाराष्ट्रामध्येच चित्रपटगृहात प्राइम टाइममध्ये स्थान मिळवण्यासाठी झगडावं लागतंय याची मला फार खंत वाटते.”
चिन्मय पुढे म्हणाला, “आम्हाला स्क्रीन मिळतात पण त्यात रात्री ११ वाजताचा किंवा सकाळी ८ किंवा ९ वाजताचा शो असतो. अशात सोशल मीडियावर आम्हाला अनेक मेसेज असे येतात की मुलांना, कुटुंबाला चित्रपट दाखवायचा आहे पण शो एक तर रात्री फारच उशीरा आहे किंवा मग सकाळी. अनेक गावातूनही आम्हाला अशाप्रकारचे मेसेज आलेले आहेत. मुलांना सुट्ट्या असल्यानं प्राइम टाइमच्या शोसाठी त्यांना घेऊन जाणं सोपं जातं पण त्यावेळी या चित्रपटाचे शो उपलब्ध नसल्याची खंत वाटते. आम्ही यासाठी प्रयत्न करत आहोत.”
दरम्यान चिन्मय मांडलेकरच नाही तर मराठीतील इतरही काही कलाकारांनी मराठी चित्रपटांना प्राइम टाइम मिळत नसल्याच्या मुद्द्यावरून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. महाराष्ट्रातच मराठी चित्रपटांची ही अवस्था दुर्दैवी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ‘शेर शिवराज’ चित्रपटात चिन्मय मांडलेकरनं छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर मुकेश ऋषी हे अफजल खानाच्या भूमिकेत आहेत.