उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा ठाकरे यांच्या हस्ते सत्कार
ठाणे – महाराष्ट्रात मराठी भाषा बोलण्यासाठी काही जणांना लाज वाटत होती, तर काही जणांना ही सक्ती वाट होती. मात्र 15 वर्षापूर्वी मनसेने लगावलेल्या कानाखालीमुळेच महाराष्ट्र राज्यात मराठी टिकली असल्याचे वक्तव्य शर्मिला ठाकरे यांनी केले. मराठी राजभाषा दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे ठाण्यात आल्या होत्या. गडकरी रंगायतन येथे गौरव महिलांचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी वरील विधान केले. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांचा सत्कार शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मनसेच्या सरचिटणीस रिटा गुप्ता, मनसे नेते अभिजित पानसे, ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव, शहर अध्यक्ष रविंद्र मोरे, महिला अध्यक्ष समीक्षा मार्कंडे आदी उपस्थित होते.
राजकारणात महिलांनी आपले स्थान चांगले निर्माण केले असून महाराष्ट्रात जागतिक कीर्तीचे रत्न तयार झाले असल्याचे यावेळी शर्मिला ठाकरे यांनी सांगितले. दरम्यान जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी आपण मराठीच बोलले पाहिजे, आपण मराठीमध्ये संवाद साधला तरच समोरची व्यक्ती मराठीत बोलू शकेल. त्यामुळे प्रत्येकाने आपले मराठीपण जपले पाहिजे असे यावेळी ठाकरे यांनी सांगितले. मराठी भाषेसाठी मनसेच्या कार्यकर्त्यांकडून अनेकवेळा खळखट्याक आंदोलने केल्यानंतर विविध ठिकाणी मराठी भाषेच्या पाट्या, मराठी भाषेचा वापर होऊ लागला. हे फक्त मनसेच्या कार्यकर्त्यांकडून शक्य झाले आहे. 15 वर्षापूर्वी मनसेने लगावलेल्या कानाखालीमुळेच हे शक्य झाल्याचे यावेळी शर्मिला ठाकरे यांनी सांगितले.
यावेळी महिलांसाठी विविध मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले होते. मराठी भाषेच्या शिक्षकांचे सत्कार शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच मनसे मध्यवर्ती कार्यालय, विष्णूनगर येथे आयोजित केलेल्या “मराठी स्वाक्षरी ” कार्यक्रमाला देखील त्यांनी हजेरी लावून स्वतः मराठीत स्वाक्षरी केली. गडकरी रंगायतन येथे महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला.