ओटीपी-पासवर्ड शेअर करणे पडू शकते महागात

ज्ञानसाधना महाविद्यालयात सायबर गुन्ह्यांबाबत केले मार्गदर्शन

ठाणे : सायबर गुन्हे घडू नये यासाठी सावध राहून सतर्कता बाळगली पाहिजे असे मार्गदर्शन ठाणे सहपोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी बुधवारी विद्यार्थ्यांना केले.

ज्ञानसाधना महाविद्यालयात सायबर गुन्हे आणि वाहतूक सुरक्षा या विषयावर आयोजित परिसंवादात विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी सतर्क कसे राहिले पाहिजे, कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत याबाबत ठाण्याचे सह पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सह पोलीस आयुक्त म्हणाले की, सायबर गुन्हे हे कोणासोबततही घडू शकतात. यात फेसलेस आणि बॉर्डरलेस क्राईम देखील आहेत. सायबर गुन्हे घडू नये यासाठी सावधगिरीचा उपाय म्हणजे नागरिकांनी स्वत: सतर्क राहणे आणि सावधानता बाळगणे. आपण कळत न कळत ओटीपी, पासवर्ड शेअर करतो आणि भक्ष्याचे शिकार ठरतो. त्यामुळे कोणतीही माहिती शेअर करताना सावध राहणे अत्यंत आवश्यक असते. वाहतूकीबाबतही तेवढी काळजी घेतली पाहिजे. भारताला दरवर्षी साडेचार ते पाच लाख अपघात होतात. त्यापैकी दीड लाख लोक अपघाताने मृत्यू पडतात. कोणत्याही साथीच्या रोगापेक्षा अपघाताचा रोग हा भस्मासूर आहे. आपल्याकडे अनेक जण वाहन चालवताना मोबाईलवर बोलतात अशी तीव्र नाराजी कराळे यांनी व्यक्त केली.

या परिसंवाद कार्यक्रमास वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड, ‘ठाणेवैभव’ चे संपादक मिलिंद बल्लाळ,
ज्ञानसाधना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश भंगुरे, इतर विभागीय आयुक्त व अधिकारी उपस्थित होते.