नागपूर : उद्धव ठाकरे यांना काँग्रेस किती बेईमान आहे, हे आता कळले असेल. महाविकास आघाडीमध्ये खरी लढाई मुख्यमंत्रीपदासाठी सुरू आहे. काँग्रेस आणि शरद पवारांनी जेवढा उद्धव ठाकरे यांचा वापर करायचा होता तेवढा केला, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी महाविकास आघाडीला लागवला आहे.
महाविकास आघाडीमध्ये छोटा भाऊ आणि मोठा भाऊ यावरून वाद होतांना दिसत आहे. संजय राऊत म्हणाले, काँग्रेस जर स्वतःला मोठा भाऊ समजत आहे तर लोकसभेत शिवसेनेमुळे काँग्रेसची जागा वाढली आहे. त्यावर प्रतिक्रिया देतांना ते बोलत होते.
बावनकुळे म्हणाले, आता उद्धव ठाकरे यांना कळले असेल की, काँग्रेस किती बेईमान आहे. आणि काँग्रेस पार्टी किती बेईमान आहे ते त्यांना पुन्हा कळेल. खरं तर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे, तर शरद पवार आणि काँग्रेस त्यांना मुख्यमंत्री बनवायला तयार नाही. शरद पवार यांना सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री बनवायचं आहे. तर काँग्रेसमध्ये नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे. महाविकास आघाडी मुख्यमंत्री पदासाठी भांडत आहे. तर महायुती डबल इंजिन सरकार केंद्र आणि राज्यसरकार मिळून 14 कोटी जनतेसाठी कामं करत आहे. हा मूलभूत फरक महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये आहे.
आम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पुढची पाच वर्षे चालू ठेवण्यासाठी काम करत आहोत. तर काँग्रेस आणि महाविकास आघाडी ही योजना बंद करण्यासाठी काम करत आहे.
उद्धव ठाकरे दोन दिवस काँग्रेसच्या प्रत्येक नेत्याला भेटायला दिल्लीत गेले होते. मात्र त्यांना कोणी गांभीर्याने घेतले नाही. मुंबईच्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यातही त्यांना कोणी गांभीर्याने घेत नाही. आणि आता मुख्यमंत्री कोण हे जाहीर करावे लागेल या भीतीने महाविकास आघाडीचे मेळावे बंद झाले आहेत, असा टोला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला.