महागाईविरोधात शरद पवार गटाचा आक्रोश

रस्त्यावर दुचाकी आडवी पाडून जोरदार निदर्शने

ठाणे: वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळविण्यात राज्य आणि केंद्र सरकारला अपयश येत आहे. दिवसेंदिवस खाद्यतेल, इंधन, सिलेंडरचे दर वाढत आहेत, असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार ॠता आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यात दुचाकी आडवी करून जोरदार निदर्शने करण्यात आली.

शहराध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिलाध्यक्षा सुजाता घाग, युवक अध्यक्ष विक्रम खामकर, प्रदेश प्रवक्त्या रचना वैद्य आणि पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गेल्या काही दिवसांपासून सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढू लागले आहेत. तेल, धान्य, कडधान्य, घरगुती गॅस, इंधन यांचे दर गगनाला भिडत आहेत. मात्र, त्याचे कोणतेही सोयरसुतक सरकारला नाही, असा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. गाड्या घ्या..! सायकली द्या; महागाई कशासाठी..! गद्दारांच्या सोयीसाठी; 50 खोके महागाई ओके; महागाई कशासाठी, आमदारांच्या खरेदीसाठी अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

इथे दुचाकी आडवी पाडून आंदोलन करण्यात आले आहे. मात्र, या देशाची अर्थव्यवस्थाच धारातीर्थ पडली असल्याचा आरोप ॠता आव्हाड यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

या आंदोलनात मर्जिया पठाण, प्रभाकर सिंग, सुरेंद्र उपाध्याय, ॲड. कैलास हावळे, गजानन चौधरी, राजु चापले, प्रफुल कांबळे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.