ठाणे : श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास आयोजित यंदाच्या रौप्य महोत्सवी वर्षातील हिंदु नववर्ष स्वागतयात्रेचे स्वागताध्यक्ष म्हणून टीजेएसबी सहकारी बँकेचे अध्यक्ष शरद गांगल यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. सोमवारी श्री कौपिनेश्वर मंदिर सभागृहात आयोजित बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या वतीने हिंदु नववर्षानिमित्त ३० मार्च रोजी स्वागतयात्रा काढण्यात येणार आहे. स्वागतयात्रेचे यंदाचे २५ वे वर्ष असल्याने या स्वागतयात्रेला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. यात्रेच्या नियोजनासाठी सोमवार ३ मार्च रोजी पार पडलेल्या बैठकीत टीजेएसबीचे शरद गांगल यांची स्वागताध्यक्ष म्हणुन घोषणा करण्यात आली. या बैठकीला न्यासाचे अध्यक्ष उत्तम जोशी, कार्याध्यक्ष संजीव ब्रह्मे, कार्यवाह डॉ.अश्विनी बापट, निमंत्रक तनय दांडेकर, पितांबरीचे रविंद्र प्रभुदेसाई, सुहृदयी उद्योजक एसएमसीचे सुहास मेहता यांच्यासह विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सर्वानी गांगल यांचे अभिनंदन केले.
अभाविपचे कार्यकर्ते व संघ स्वयंसेवक असलेले शरद गांगल हे सध्या टीजेएसबी बँकेचे अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर सेवा सहयोगच्या विद्यार्थी साहाय्य योजनेचे दायित्व, सहकार भारती प्रांत पदाधिकारी तसेच अनेक सामाजिक संस्थांच्या कामात त्यांचा सहभाग आहे. ते मानव संसाधन (एचआर) क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत. त्यांनी थरमॅक्स कंपीनीत कार्यकारी संचालक, एचडीएफसी स्टँडर्ड लाईफ इन्शुरन्सचे महाव्यवस्थापक तसेच कॅडबरी, एशियन पेन्ट अशा कंपन्यांमध्ये महत्त्वाची पदे भूषविली आहेत. राष्ट्रीय सहकार भारतीचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य आणि सिंबायोसिस या शैक्षणिक संस्थेच्या शैक्षणिक परिषदेशी संलग्न आहेत.