ठाण्यात काँग्रेसचे ‘शर्म करो’ आंदोलन

ठाणे : महाराष्ट्र सरकारने कोरोना पसरवला असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्याबद्दल महाराष्ट्रातील जनतेची मोदींनी माफी मागावी, अशी मागणी ठाणे शहर काॅग्रेस अध्यक्ष अॅड.विक्रांत चव्हाण यांनी आज ठाण्यात केली.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत महाराष्ट्र काँग्रेसमुळे संपूर्ण देशात कोरोना वाढला अशा केलेल्या बेजबाबदार, असत्य आणि निराधार वक्तव्यांमुळे छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राची देशभर बदनामी झाल्याची टीका करत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार शासकीय विश्रामगृहाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन धरणे आंदोलन केले.

या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर महिला कार्यकर्त्यांसह काँग्रेस कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. याप्रसंगी बोलताना काँग्रेस शहराध्यक्ष अँड.विक्रांत चव्हाण यांनी सागितले की, महाराष्ट्राबद्दलच्या वक्तव्यामुळे नरेंद्र मोदी हे नक्की पंतप्रधान आहेत की एका राज्याचे मुख्यमंत्री आहेत असा प्रश्न पडतो. मोदींनी एक दिवस आधीच मुंबईत येऊन लतादीदींचे अंतिम दर्शन घेतले व दुस-याच दिवशी त्यांनी हे वक्तव्य केल्यामुळे त्यांनी लतादीदींचाही अपमान केला आहे. ₹ देशातील विविध राज्यात काँग्रेसचा जनाधार वाढत असल्यामुळेच मोदींचे संतुलन बिघडले असून संसदेत सातत्याने काँग्रेसवर टीका करण्याचे काम पंतप्रधान करित असल्याचे त्यांनी सांगितले.