शहापूर उपनगराध्यक्ष विजय भगत समर्थकांसह शिवसेना शिंदे गटात

शहापूर : शहापूर तालुक्यातील शिवसेना ठाकरे गट पक्षाचे शहापूर शहराध्यक्ष व नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष विजय भगत यांनी त्यांच्या शेकडो समर्थकांसह शिंदे गट शिवसेनेत ठाणे येथील आनंदआश्रम येथे उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला.

विजय भगत यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने शहापूर नगरपंचायतमध्ये शिवसेनेची ताकद वाढली आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत फायदा होणार असून शहापूर तालुक्यातील विविध पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते लवकरच पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून मोठ्या संख्येने प्रवेश करणार असल्याचे शिवसेना नेते प्रकाश पाटील व जिल्हाप्रमुख मारुती धिर्डे यांनी यावेळी सांगितले.

ठाकरे गट शिवसेनेचे शहापूर शहर प्रमुख व उपनगराध्यक्ष विजय भगत, महिला आघाडी शहरप्रमुख प्रतिभा भागवत, तालुका संपर्कप्रमुख जयवंत तारमळे, उप तालुकाप्रमुख निलेश मांजे, उप शहरप्रमुख कुशल झुंजारराव, जितेंद्र चौधरी, युवा विभाग प्रमुख विनोद केणे, उपविभाग प्रमुख रविंद्र भागवत, शाखाप्रमुख राहुल पवार, राहुल साळवी, राजेश केने, तन्मय पवार, विष्णू कुरकुटे, मनीष अधिकारी, युवा सेना शहरप्रमुख सुमित दाभणे, विक्रम वीदे, माजी नगरसेवक विनोद भोईर, संतोष तेलवणे व राजेश तोडकर या पदाधिकाऱ्यांसह शेकडो शिवसैनिकांनी यावेळी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला.

शहापूर विधानसभा निवडणुकीत ठाकरे गट शिवसेनेला महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली नसल्याने नाराज झालेल्या शिवसैनिकांना आपापल्या पक्षात घेण्यासाठी युतीच्या पदाधिकाऱ्यांची रस्सीखेच सुरू आहे. शहापूर तालुक्यातील ठाकरे गटातील नाराज पदाधिकारी आपले वर्चस्व टिकून ठेवण्यासाठी भाजपा, शिंदे गटात जात असल्याने तसेच काहींना जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत उमेदवारीचे गाजर दाखवल्याने सत्ताधारी पक्षाकडे आकर्षित होत असल्याचे ठिकठिकाणी होत असलेल्या चर्चेत जाणवत आहे.