शहापूर-मुरबाड बस पलटी; ३५ प्रवासी गंभीर जखमी

* ५० प्रवासी किरकोळ जखमी
* प्रवाशांना बाहेर काढल्यानंतर बसने पेट घेतला.

शहापूर: मुरबाड एस.टी. बस आगारातून शहापूरकडे निघालेल्या शहापूर आगारातील बसला कुडवली जवळील उतारावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात होऊन बसमधील अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले. जखमी प्रवाशांवर उपचार सुरु आहेत. प्रवाशांना बाहेर काढल्यानंतर बसने पेट घेतला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

मुरबाड येथून दुपारी १२ वाजून १० मिनिटांनी शहापूरकडे निघालेल्या बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने उताराला जाऊन अपघात घडला. बसमधील प्रवाशांना मार लागल्याने या अपघातात ३५ प्रवासी गंभीर, तर १५पेक्षा जास्त प्रवासी किरकोळ जखमी झाले. बसमध्ये ७२ प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली. प्रवाशांनी आरडाओरड केल्याने काही काळ तेथे गोंधळ उडाला होता. जखमी प्रवाशांवर मुरबाड येथील शासकीय रुग्णालय तसेच खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शहापूर तालुक्यातील एस.टी. आगारात नादुरुस्त गाड्यांचा भरणा असल्याने त्यांचे ब्रेक डाऊन होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. कालच शहापूर आगारातून निघालेली बस अवघ्या काही किलोमीटर अंतरावर येऊन बंद पडून प्रवशांना ताटकळत उभे राहावे लागले. शहापूर तालुक्यातील रस्त्यांवर रोज एक तरी बस कुठेना कुठे ब्रेक डाऊन झाल्याचे पहावयास मिळत असल्याने एसटीचा प्रवास बेभरवशाचा झाल्याची भावना प्रवाशांमध्ये निर्माण झाली आहे. एसटी संदर्भात कोणत्याही प्रकारची माहिती घेण्यासाठी फोन लावला असता नॉट रिचेबल सांगण्यात येते तर येथील आगार प्रमुखांचा नंबर घेण्याचा प्रयत्न केल्यास कोणताही कर्मचारी मोबाईल नंबर देण्यास धजावत नाहीत. तथापी आगार प्रमुखांशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.