महिन्याभरात चौथ्या लाटेचे सात बळी

ठाणे : महिन्याभरात ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोनामुळे सात जणांना जीव गमवावा लागला असून चौथ्या लाटेने ठाणेकरांच्या चिंतेत भर घातली आहे.

ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम राबवूनही कोरोना संसर्गावर नियंत्रण आणण्यात यश येत नसल्याचे दिसत आहे. पहिल्या लाटेत बाधितांची संख्या कमी होती मात्र मृत्यूचे प्रमाण अधिक होते. दुसऱ्या लाटेत बाधितांची संख्या जास्त होती. मात्र मृत्यूचे प्रमाण थोडे कमी करता आले. तिसरी लाट आली आणि ओसरलीही. लसीकरणामुळे त्याचा परिणाम फारसा जाणवला नाही.

११ मे रोजी ठाणे महपालिकेचे कोव्हिड रुग्णालय रुग्णमुक्त झाले होते. अडीच वर्षांमध्ये पहिल्यांदाच रुग्णालयात एकही कोरोना रुग्ण दाखल नव्हता. मात्र आता ही संख्या शंभरीपार गेली आहे. ३० जून रोजी  पालिकेच्या कोव्हिड रुग्णालयात १०६ रुग्ण उपचारासाठी दाखल होते. आजच्या घडीला ८६ रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांपैकी पाच जण व्हेंटीलेटरवर आहेत. नऊ जणांना ऑक्सिजन लावण्यात आले आहे. तर २१ रुग्ण विलगीकरण केंद्रात दाखल आहेत. ठाणे पालिका क्षेत्रात आतापर्यंतच्या कोरोना बाधितांची एकुण संख्या एक लाख ९१,२९० इतकी झाली आहे. जून महिन्यात ६,४६६ रुग्णांची भर पडली आहे. त्यापैकी आता १,९८६ रुग्ण सक्रीय आहेत.

चौथ्या लाटेत रुग्णसंख्या वाढलीच पण जून महिना आणि जुलैमधील पहिले तीन दिवस या काळात सात बळीही गेले. चौथ्या लाटेत १४ जूनला पहिल्या मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर २३ जून आणि २७ जूनपासून सलग तीन दिवस तीन मृत्यूची नोंद झाली आहे. जूनमध्ये एकुण पाच कोव्हिड मृत्यूच्या घटना घडल्या आहेत. जुलैमध्येही १ आणि २ तारखेला सलग दोन कोरोना मृत्यूची नोंद झाली आहे.