कोट्यवधींचा सेवा रस्ता संरक्षक भिंत टाकून बंदिस्त

अतिक्रमणे होऊ नयेत म्हणून दक्षता घेतल्याचा प्रशासनाचा दावा

ठाणे : कोट्यवधी रुपये खर्च करून लोकमान्यनगर परिसरातील तरण तलावाला लागूनच सुमारे सव्वा कोटी खर्च करून बांधलेला सेवा रस्ता संरक्षक भिंत बांधून बंदिस्त करण्यात आला आहे. मनसेने याबाबत भ्रष्टाचाराचा आरोप केला असला तरी प्रशासनाने मात्र रस्ता अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी ही भिंत बांधल्याचा दावा केला आहे.

या प्रश्नी नगरअभियंता यांना वारंवार निवेदन देऊन हा प्रकार निदर्शनास आणून दिल्यानंतरही अधिकाऱ्यांकडून उडवा उडवीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोप मनसेचे स्वप्नील महिंद्रकर यांनी केला आहे. विशेष म्हणजे या बांधलेल्या भिंतीबाबत महापालिकेच्या कोणत्याही दस्ताऐवजावर नोंद नसून कोणतीही निविदा नसताना ठेकेदाराकडून बेकायदेशीरित्या भिंत बांधलेली असल्याचे महिंद्रकर यांनी म्हटले आहे. पालिका प्रशासनाने मात्र सर्व आरोप फेटाळले असून प्रक्रिया कायदेशीर झाली असल्याचा खुलासा केला आहे.

पालिकेचे अधिकारी बेकायदेशीर अतिक्रमण करत असल्याचा प्रकार धक्कादायक असून पालिका आयुक्तांनी याप्रश्नी चौकशी करून संबंधित दोषी अधिकाऱ्यांना त्वरीत निलंबित करावे व ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा. हा रस्ता सर्वसामान्य नागरिकांसाठी बांधला असून तो त्यांच्यासाठी खुला करावा. अन्यथा मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही महिंद्रकर यांनी दिला आहे.

सदरच्या कामात कोणत्याही प्रकारचा गैरकारभार झालेला नसून विकास आराखड्यातील हा सेवा रस्ता विकसित करण्यात आला आहे. विकास आराखड्यात या सेवा रस्त्याचे आरक्षण असून रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. पुढच्या प्रक्रियेला विलंब लागणार असल्याने सदरच्या जागेत अतिक्रमण होऊ नये यासाठी संरक्षक भिंत बांधण्यात आली असल्याचे कार्यकारी अभियंता महेश बहिरम यांनी सांगितले.