ठाणे : ठाणे महापालिकेचे सभागृह नेते अशोक वैती यांनी पालिकेच्या संगणक विभागावर गंभीर आरोप केले असून यासंदर्भात सभागृहात चर्चा करण्यासाठी त्यांनी महापौर नरेश म्हस्के यांना पत्र दिले आहे. महापौरांना दिलेल्या पत्रामध्ये वैती यांनी या विषावर चर्चा करण्यासाठी महापौरांकडे वेळ मागितली असून संगणक विभागाच्या संदर्भात त्यांनी महापौरांकडेच पत्राच्या माध्यमातून माहिती मागितली आहे.
ठाणे महापालिकेचे अनेक विभाग हे त्यांच्या कारभारामुळे सत्ताधारी तसेच विरोधकांच्या टीकेचे धनी आतापर्यंत ठरले आहेत.यावेळी संगणक विभागाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले असून हे आरोप सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक आणि पालिकेचे सभागृह नेते अशोक वैती यांनी केले आहेत. अशोक वैती यांनी महापौरांना दिलेल्या पत्रामध्ये संगणक विभागाकडून टेंडर प्रक्रियेची पद्धती ही इंटरनेटवर टाकण्यात येत असून टेंडरच्या अनुषंगाने संगणक विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी हे ठेकेदारांकडून काही अपेक्षा व्यक्त करत आहे. त्यामुळे यामध्ये काही तरी घोळ आहे अशी चर्चा असल्याचा आरोप त्यांनी त्यांच्या पत्रामध्ये केला आहे.
ही अतिशय गंभीर बाब असून महापालिकेच्या संगणक विभागामध्ये किती ऑपरेटर्स काम करतात ? त्यांच्याकडे कोणत्या प्रकारचे काम देण्यात आले आहे याची माहिती त्यांनी महापौरांकडून पत्राच्या माध्यमातून मागितली आहे. या विषयावर सर्वसाधारण सभेत चर्चा करण्यासाठी त्यांनी महापौरांकडे वेळ देखील मागितला आहे. ठाणे महापालिकेत गेली अनेक वर्ष शिवसेनेची सत्ता आहे. अशोक वैती हे सत्ताधारी शिवसेना पक्षाचेच नगरसेवक असून या त्यांच्या पत्रामुळे सत्ताधारी सत्ताधारी शिवसेनेचे प्रशासनावर अंकुश नसल्याचे त्यांना सुचवायचे नसेल ना ? असा अशी साशंकता निर्माण झाली असून सत्ताधारी शिवसेनेलाच घरचा आहेर दिला नाही असा प्रश्न आता यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.