नवी मुंबई : लोकसभा निवडणुकीपूर्वी कल्याण तालुक्यातील खोणी गटात असणाऱ्या चौदा गावांना आता नवी मुंबई महापालिका हद्दीत समाविष्ट करणारी अंतिम अधिसूचना शासनाने जारी केली. ८ जुलै २०२४ रोजी या ठिकाणी नवी मुंबई महानगर पालिकेने येथील कार्यभार पाहण्यासाठी एका कार्यकारी अभियंत्याची नियुक्ती केली आहे. असे असले तरी येथील पायाभूत सेवा, नागरी सेवा पुरवण्यासाठी सर्वप्रथम येथील विभागाचा स्वतंत्र विकास आराखडा तयार करावा लागणार आहे.
नवी मुंबई महानगर पालिकेची स्थापना झाल्यानंतर २८ वर्षांनी येथील विकास आराखड्याने आकार घेतला आहे. मात्र नवी मुंबईतील शहर हे सिडकोनिर्मित असल्याने आजवर मनपा सिडकोच्या विकास आराखड्यावर आपला विकासाचा रथ हाकत आलेली आहे. आता नवी मुंबई महानगर पालिकेने तयार केलेला विकास आराखडा शासन दरबारी अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत असताना आता नवी मुंबई महानगर हद्दीत १४ गावांना समावेश करण्याची अंतिम अधिसूचना शासनाने मार्च २०२४ मध्ये काढली. ही गावे आता नवी मुंबई शहरात जरी अधिकृत झाली असली तरी त्याचा विकास साधताना मनपाला मोठी कसरत करावी लागणार आहे.
२०२२ मध्ये आघाडी सरकारमध्ये नगरविकास मंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी ही गावे नवी मुंबईत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मार्च २०२४ मध्ये याची अंतिम अधिसूचना काढून ही गावे अधिकृतपणे नवी मुंबईत समाविष्ट करण्यात आली. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेने देखील या गावात कारभार पाहण्यासाठी पावले उचलत एका कार्यकारी अभियंत्याची नियुक्ती केली आहे. त्यामुळे या भागात नियोजित विकास करण्यासाठी सर्वप्रथम या भागाचा विकास आराखडा तयार करावा लागणार आहे.
नवी मुंबई महानगर पालिकेचा विकास आराखडा तयार आहे. आता महापालिकेत नव्याने १४ गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे येथील विकास कामांसाठी नवीन विकास आराखडा तयार करावा लागेल. मनपा आयुक्तांनी मंजुरी देताच येथील विकास आराखड्याच्या कामाला सुरुवात करण्यात येईल, असे नगर रचनाकार सोमनाथ केकान यांनी सांगितले.