सेन्सेक्स एकाच दिवसात तीन हजार अंकांनी वधारला

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या शस्त्रसंधी आणि अमेरिका-चीनमध्ये सुरू असलेल्या टॅरिफवरील चर्चेचा सकारात्मक परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाल्याचे दिसून आले. शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 3.74 टक्के तर निफ्टीमध्ये 3.82 टक्क्यांची वाढ झाली. सेन्सेक्समध्ये 2,975 अंकांची वाढ होऊन तो 82,429 वर स्थिरावला. तर निफ्टीमध्ये 916 अंकांची वाढ होऊन तो 24,924 पोहोचला.

भारतासाठी संरक्षण उपकरणे तयार करणाऱ्या कंपन्यांचे आणि शस्त्रास्त्र उत्पादक कंपन्यांना शस्त्रास्त्र उपकरणे पुरवणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स वाढले. यामध्ये भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल), भारत डायनॅमिक्स लिमिटेड (बीडीएल), सी२सी ॲडव्हान्स (एरोस्पेस अँड डिफेन्स कंपनीज स्टॉक), लार्सन, मिश्र धातू, आयडियाफोर्ज टेक या कंपन्यांचा समावेश आहे.

भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीमुळे बाजारात तेजी आल्याचे सांगितले जात आहे. या तेजीमागे परदेशी गुंतवणूकदारांकडून होणारी खरेदी हे एक प्रमुख कारण आहे. देशाच्या जीडीपी आणि उत्पन्नात सुधारणा होण्याची अपेक्षा, चलनवाढ आणि व्याजदर यांसारख्या देशांतर्गत मॅक्रो निर्देशांकात घट ही बाजारातील गती पुनरुज्जीवित होण्याची चिन्हे आहेत.

आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, बजाज फायनान्स, आरआयएल, एल अँड टी, भारती, अल्ट्राटेक, एम अँड एम आणि आयशर या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक मोठ्या प्रमाणात केली जात आहे.