किशोर गटात सराव करणार
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील कबड्डीपटुंना कबड्डीच्या क्षेत्रात चांगला वाव मिळण्यासाठी ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने विविध गटांमध्ये प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी किशोर गटात ‘ठाणे जिल्हा कबड्डी असोशिएशन’च्या वतीने आर्यन सकपाळ या अष्टपैलू खेळाडुची निवड झाली आहे.
ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने आणि सहकार्याने किशोर – किशोरी गट जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा शनिवारी, ७ ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर 23 या कालावधीत चार मातीच्या क्रीडांगणावर सकाळी नऊ ते सायंकाळी 9 वाजेपर्यंत ठाणे पूर्व कोपरीतील धर्मवीर क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आली आहे, असे संकुलाचे अध्यक्ष कृष्णा दादू पाटील यांनी सांगितले.
या स्पधेर्तून महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने परभणी येथे होणा-या किशोर / किशोरी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत सहभागी होणा-या ठाणे जिल्ह्याच्या ठाणे ग्रामीण आणि ठाणे शहर किशोर/किशोरी संघाच्या अंतिम 12-12 खेळाडूंची निवड केली जाणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणा-या ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या ठाणे शहर आणि अन्य ठाणे ग्रामीण किशोर/ किशोरी गट संघाच्या अंतिम निवडीसाठी खेळाडूंच्या प्राथमिक संघामध्ये आर्यनची निवड झाली आहे.
संबंधित खेळाडूंना सोमवारी, 16 ऑक्टोबर 23 रोजी दुपारी चार वाजता सराव शिबिरासाठी धर्मवीर क्रीडा संकुल कोपरी पूर्व येथे राहण्याची सूचना करण्यात आली आहे.
या सराव शिबिरातून ठाणे ग्रामीण व ठाणे शहर किशोर/ किशोरी संघाची अंतिम 12-12 खेळाडूंची निवड केली जाणार आहे. सराव शिबिरासाठी वेळेवर न येणा-या खेळाडूंचा निवडीसाठी विचार केला जाणार नाही तसेच सरावाच्या पहिल्या दिवशी सर्व खेळाडूंची वजने घेतली जातील. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनने खेळाडूंच्या वयाच्या दाखल्याबाबतच्या निकषाचे परिपत्रकही आहे.
या अनुषंगाने निवड झालेल्या खेळाडूंची खेळाडूंनी वयाबाबतचे मूळ कागदपत्रे सरावाच्यावेळी सोबत आणणे आवश्यक आहे. कागदपत्राची पूर्तता न झाल्यास संबंधित खेळाडूचा निवडीसाठी विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी, अशी माहिती असोसिएशनचे सरचिटणीस मालोजी भोसले यांनी दिली.