ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी सुरक्षा वाढवली

ठाणे: राज्यात मराठा आंदोलकांकडून काही ठिकाणी जाळपोळ करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. निवासस्थानाबाहेरील रस्ता देखील वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे.

मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात चर्चेत आला आहे. मराठा समाजाने यापूर्वी लाखोंच्या संख्येने शांतीच्या मार्गाने मोर्चे काढले, परंतु आता मराठा आरक्षण आंदोलनाला काही प्रमाणात हिंसक वळण लागले आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या ठाण्यातील कार्यालयात सुनील तटकरे आले असताना त्यांना काळे झेंडे दाखवत मराठा बांधवांनी निषेध केला. अंबादास दानवे देखील ठाण्यात येणार असल्याचे कळताच मराठा बांधवांनी घोषणाबाजी केल्या. राज्यांत देखील काही आमदारांच्या घरात आणि कार्यालयावर दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानाबाहेर पोलिसांचा फौजफाटा वाढवण्यात आला आहे. ५० अतिरिक्त पोलिस अधिकारी आणि कर्मचारी निवासस्थानाच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आला आहे. मुख्य आणि इतर प्रवेशद्वारावर पोलिसांची अतिरिक्त तुकडीही नेमण्यात आली आहे. मुख्यमंञ्यांच्या निवासस्थानसमोरील रस्त्यावर पोलिस कडक पहारा देत असून एसआरपीएफची अतिरिक्त तुकडीही तैनात करण्यात आली आहे.

मंगळवार सकाळपासून मुख्यमंञी शिंदे यांच्या निवासस्थानाच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी पोलिस अधिकार्‍यांची वर्दळ वाढली आहे. ठाण्याचे सह पोलीस आयुक्त दत्ताञय कराळे, अपर पोलीस आयुक्त महेश पाटील यांनी येथील सुरक्षेची पाहणी केली. यावेळी परिमंडळ पाचचे उपायुक्त अमरसिंह जाधव, वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक जितेंद्र राठोड उपस्थित होते.