कल्याण: कल्याण-डोंबिवली मनपा क्षेत्रात कोरोनाग्रस्त दोन जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. प्रशासनाने कोरोनाच्या संभाव्य पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सज्ज असून कोरोना संदर्भात घेण्याची दक्षता आणि काळजीबाबत प्रशासनाकडून नागरिकांना अवहान करण्यात आले आहे.
कडोंमपा क्षेत्रातील बुधवारची कोरोना रुग्ण संख्या एक असून एकूण रुग्ण आठ झाले आहेत. यापैकी खासगी रुग्णालयात दाखल कोरोना रुग्ण दोन असून डिस्चार्ज दिलेल्या कोरोना रुग्णांची संख्या तीन आहे. सहाव्याधी असलेल्या दोन कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गृह विलगीकरणात एक रुग्ण असून त्याची प्रकृती स्थिर आहे.
कडोंमपा क्षेत्रात कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी डोंबिवलीतील 67 वर्षाचा इसम 24 मे 2025 रोजी खाजगी हॉस्पिटल डोंबिवली येथे दाखल होता. या रुग्णाची आरटीपीसीआर टेस्ट 24 तारखेला केली असता ती पॉझिटिव्ह आली होती. या व्यक्तीस 25 मे 2025 रोजी ठाणे येथील कळवा हॉस्पिटल येथे दाखल केले गेले. या व्यक्तीला सहव्याधी म्हणजे उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास होता तसेच बारा वर्षांपूर्वी आलेल्या स्ट्रोकमुळे या व्यक्तीस पॅरालिसीस झाला होता. या व्यक्तीचा मृत्यू 28 मे 2025 रोजी सायंकाळी कळवा हॉस्पिटल येथे झाला आहे. या व्यक्तीने कोविड लस घेतलेली नव्हती, अशी माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपा शुक्ल यांनी दिली आहे.