कल्याण : विद्यमान आमदार ज्यांचे आहेत, त्या जागा आम्हीच लढवणार असून कोण काय सर्व्हे करतो हे फार महत्वाचे नाही, अशा शब्दांत भाजपचे प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी यांनी पक्षाची भूमिका मांडली.
कल्याणात भाजपा कार्यकर्त्यांशी भंडारी यांनी ‘बांग्लादेशातील संकट, सत्य आणि परिणाम’ या विषयावर संवाद साधला. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
मागील काही दिवस विधानसभेच्या जागांवरून महायुतीत नेत्यांकडून विविध विधाने करण्यात येत आहेत. त्यामुळे भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षांमध्ये उलट-सुलट चर्चा सुरू होती. ठाणे शहरासह भाजपाच्या ताब्यातील अन्य मतदारसंघांवरही दावा झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आणि नाराजीचा सूर निघत आहे. दरम्यान काल माधव भंडारी यांनी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यांचा आमदार त्यांची जागा असे गणित मांडून या वादावर आणि दाव्यांवर पडदा टाकला.
पत्रकारांशी बोलताना श्री.भंडारी म्हणाले, कार्यकर्त्यांनी उत्साहाने आपली भूमिका जाहीरपणे व्यक्त न करता आपल्या नेत्याकडे आपली भूमिका मांडली पाहिजे. वरिष्ठ नेते एकत्रित चर्चा करून निर्णय घेतीलच मात्र विद्यमान आमदार जिथे आहेत त्या जागा त्यांनाच मिळतील असे श्री.भंडारी यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमात बांग्लादेश निर्मितीवेळी १९७१ साली झालेल्या युद्धात प्रत्यक्ष सहभागी झालेले कल्याण पुर्वेत राहणारे वीर सैनिक यांचा देखील सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी कल्याण जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी, सुलभा गायकवाड, शशिकांत कांबळे, विवेक मोडक, अभिमन्यू गायकवाड, नंदू परब, अमित धाक्रस, मोरेश्वर भोईर, सुभाष म्हस्के, मनोज राय, आशिष पावसकर यांसह समाजातील विविध संस्था, संघटना पदाधिकारी व कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.