ठाणे: ठाण्यातील रामचंद्रनगरमधील लाभेश सोसायटीच्या तक्रारीवरून इमारतीमध्ये सुरू असलेल्या दोन बारवर पालिकेने सीलबंद कारवाई केली.
ठाण्यातील रामचंद्र नगरात लाभेश को. ऑप. हौ. सोसायटी आहे. या सोसायटीतील इमारतीच्या ए विंगच्या बेसमेंटमध्ये स्टोरेजच्या (गोडवून) ऐवजी श्रीमाता बिअर बार ॲण्ड रेस्टॉरंट आणि शितल बार अनधिकृतपणे सुरू आहेत. या दोन्ही बारमध्ये ठाणे महानगरपालिकेची परवानगी न घेता मंजूर नकाशाव्यतिरिक्त अनेक कामे करण्यात आली आहेत. अनधिकृत, वाढीव कामे आणि वापर बदल करण्यात आले आहेत. याबाबत २०११ पासून उपरोक्त सोसायटी ठाणे महानगरपालिकेकडे मंजूर नकाशा व्यतिरिक्त केलेली अनधिकृत बांधकामे, वाढीव आणि वापर बदल कामे तोडण्याबाबत, दोन्ही बार बंद करण्यासाठी तक्रारी करत आहेत. सोसायटीने अनेकदा दोन्ही बारमधील अनधिकृत, वाढीव बांधकामांबाबत आणि वापर बदला बाबत तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे अखेर ठाणे महानगर पालिकेने मंजूर नकाशा व्यतिरिक्त केलेली अनधिकृत कामे करणाऱ्या बारला नोटीस बजावून ते सिल करण्याचे आदेश काढले आहेत.
या आदेशानुसार शुक्रवारी (ता.२७) पालिकेने दोन्ही बार सील करण्याची कारवाई केली. इमारतीतील बार आणि अनधिकृत, वाढीव बांधकाम आणि वापर बदलाचा येथील रहिवाशांना होणारा त्रास लक्षात घेता कमिटीने मोठ्या हिमतीने आणि चिवटपणे ठाणे महानगर पालिकेच्या शहर विकास विभागाकडे पाठपुरावा केला. या इमारतीच्या विकासकाने इमारतीमध्ये मंजूर नकाशा व्यतिरिक्त अनधिकृत वाढीव बांधकामे आणि वापर बदल करून त्याची विक्रीदेखील केली होती. इमारतीच्या ए विंगच्या बेसमेंटमध्ये स्टोरेजच्या (गोडावून) ऐवजी शितल बार (चंद्र शितल बार) व श्रीमाता बिअर बार ॲण्ड रेस्टॉरंट (देवी दर्शन बार ॲण्ड रेस्टॉरंट) सुरू करून बारमधून तळमजल्यावर (दुकानाच्या रांगेत ११ नंबर गाळ्यात) जाण्यासाठी बेकायदा सिमेंट जिना बांधला आहे. त्यावरही कारवाईचे आदेश आहेत.
याबाबत सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी ठाणे महानगरपालिकेकडे केलेल्या तक्रारीची पालिकेने दखल घेत शुक्रवारी शहर विकास आणि लोकमान्य सावरकर प्रभाग समिती (सहायक आयुक्त) जा. क्र.८८५ च्या पत्रानुसार या विभागाकडून दोन्ही बारवर सीलबंद करण्याची कारवाई केली.