सुरेश सोंडकर/ठाणे
खासगी बस गाड्यांना खुलेआम बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करण्यास मोकळीक देणाऱ्या प्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिसांनी जीवघेणा प्रवास करणाऱ्या रिक्षांकडेही कानाडोळा केल्याचे पाहायला मिळत आहे.
एकीकडे खासगी बसचालक ठाणे परिवहन सेवेचा व्यवसाय हायजॅक करून पालिका आणि नागरिकांची लूट करत आहेत तर दुसरीकडे त्यांच्या बेशिस्त वर्तनामुळे अपघातांनाही खतपाणी मिळत आहे. या बाबींकडे आरटीओ आणि वाहतूक पोलीस पूर्णपणे डोळेझाक करत असल्याने त्यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त होत आहे.
यात मिटर आणि शेअर रिक्षा चालकांच्या बेशिस्तपणाची भर पडली आहे. सर्वसामान्य नागरिकांना परवडते आणि चालकांनाही ३३ टक्के फायदा होत असल्याने शहरात शेअर रिक्षाची संकल्पना पुढे आली. मात्र घोडबंदरपासून ठाणे रेल्वे स्थानकापर्यंत शेअर रिक्षा चालक तीनपेक्षा जास्त प्रवासी कोंबून व्यवसाय करत असल्याचे दिसते. बऱ्याच वेळा पाचवा प्रवासी चालका शेजारी बसलेला दिसतो. विशेष म्हणजे त्या स्थितीतही चालक वेगाने रिक्षा दामटवत असतात. असे प्रकार वाहतूक पोलिसांसमोर निर्धास्त होत असतात.
काही रिक्षा थेट टीएमटीच्या थांब्यावर उभ्या असतात. त्यामुळे जागा नसल्याने परिवहनच्या बस प्रवासी न घेताच पुढे निघून जातात. ती बस पकडण्यासाठी प्रवासी मागून धावत असल्याचे वृत्तही या आधी प्रसिद्ध झाले आहे. रिक्षा चालकांचे गैरवर्तन, बेकायदेशीर वाहतूक याकडे डोळेझाक करणारे वाहतूक पोलीस कायद्यावर बोट ठेवून अन्य वाहनांवर मात्र कारवाई करताना दिसतात. एकूणच आरटीओ आणि वाहतूक पोलीस त्यांच्या संशयास्पद भूमिकेतून कोणाचे हीत साधतात, असा प्रश्न जागरूक नागरिक उपस्थित करत आहेत.