ठाणे: एकीकडे राज्यात पावसाच्या सरी तर एकीकडे कडकडीत ऊन असे उलट चक्र पाहायला मिळत आहे. ठाणे शहरासह जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून उष्णतेचा पारा ४० अंशावर गेला असून रविवारी ठाण्यात ४२.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यामुळे ठाणेकर घामाघूम आणि अस्वस्थ झाले होते.
हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार ठाणे शहराची वाटचाल विक्रमी तपामानाकडे सुरू झाली आहे. शहरात गेल्या पाच दिवसांत तापमानात कमालीची वाढ झाली असून तापमानाने 42 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे.
यंदाच्या चढ-उताराच्या तापमानाने ठाणे, मुंबईकर बेजार झाले आहेत. ठाण्याने रविवारी तापमानाचा उच्चांक गाठला. दुपारी तापमानाने ४२.६ अंश सेल्सिअसचा टप्पा पार केला होता. यामुळे चाकरमान्यांचा सुट्टीचा रविवार घामांच्या धारांनी भिजला. सायंकाळी ७ वाजेपर्यंत ही झळ कायम होती तर रात्री ८ वाजेपर्यंत उकाडा होता. दिवसभर कडकडीत उन्हामुळे ठाणेकरांनी कामे टाळून घरातच राहणे पसंत केले. त्यामुळे घोडबंदर, पूर्व द्रुतगती महामार्गासह अंतर्गत रस्त्यांवर तुरळक वाहतूक पाहायला मिळाली.
सोमवारी (ता.२२) ठाणे शहरातील तापमान ३६.७ अंश सेल्सिअस होते. हे तापमान वाढत जाऊन रविवारी तापमान ४२.६ अंश सेल्सिअसवर जाऊन पोहचले. काल शनिवारी तापमान ४१.३ अंश एवढे होते. त्यानंतर एका दिवसात तापमानात दीड अंशाची वाढ होऊन रविवारी ४२.६ अंशावर पारा गेला.
महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांनी थंड पेय पिणे पसंत केले. तरीही शरीरात गारवा निर्माण होत नव्हता. मफलर आणि स्कार्फ एवढाच आधार नागरिकांना राहिला होता. या कडकडीत उन्हाचा फटका पशू पक्ष्यांनाही बसत आहे. येऊरसारख्या जंगलात पाण्याचे स्त्रोतही आटू लागले आहेत. काही संस्थांकडून येथील वन्य प्राण्यांना पाण्याची चणचण भासू नये म्हणून नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत गाळमुक्त करण्यात येत आहेत तर वन्य विभाग देखील प्राण्यांच्या पाण्याची काळजी घेत आहे.
असा वाढत गेला तापमानाचा आलेख (कंसात किमान तापमान)
२२ एप्रिल: कमाल ३६.७ (२५.९)
२३ एप्रिल: कमाल ३७.२ (२४.९)
२४ एप्रिल: कमाल ३९.२ (२७.१)
२५ एप्रिल: कमाल ३९.३ (२७.१)
२६ एप्रिल: कमाल ३८.६ (२७.७)
२७ एप्रिल कमाल ४१.३ (२८.४)
२८ एप्रिल: किमान ४२.६ (२५.३)