अनधिकृत बांधकामांची शाळा; आयुक्त लावणार कडक शिस्त

अनधिकृत बांधकामांचा घेणार आढावा

ठाणे : अनधिकृत बांधकामांमुळे बदनाम झालेल्या महापालिकेला शिस्त लावण्याचा प्रयत्न नवीन महापालिका आयुक्त सौरभ राव हे करणार असून अनधिकृत बांधकामांचा उद्या ते आढावा घेणार आहेत.त्यामुळे या बांधकामांना अभय देणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

ठाणे महापालिका हद्दीत विशेषतः मुंब्रा, कळवा आणि दिवा या प्रभाग समिती क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकाम सुरु आहेत. काही प्रमाणात वर्तकनगर, माजिवडा मानपाडा प्रभाग समिती येथे देखील या बांधकामांचे पेव फुटले आहे.

अनधिकृत बांधकामांचा मुद्दा नागपूर येथिल हिवाळी अधिवेशनात गाजला होता. आमदार संजय केळकर यांनी याबाबत आक्रमक भूमिका घेतली होती. या बांधकामांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. तरी देखिल अनधिकृत बांधकाम सुरूच असल्याच्या तक्रारी महापालिका प्रशासनानेकडे येत आहेत. त्यामुळे महापालिका आयुक्त श्री. राव यांनी उद्या अनधिकृत बांधकामांची माहिती घेऊन आढावा बैठकीला उपस्थित राहण्याच्या सूचना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.

अनधिकृत बांधकामांची संख्या, किती बांधकामांना नोटीसा दिल्या आहेत, किती जणांच्या विरोधात एमआरटीपी कायद्यानुसार कारवाई केली आहे, त्याचबरोबर धोकादायक इमारतींच्या बाबत देखिल उद्याच्या बैठकीत चर्चा केली जाणार आहे.

अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना फक्त नोटीस देऊन थातूर मातुर कारवाई केली जाते. त्याबाबत देखिल आयुक्त गांभीर्याने विचार करत आहेत आचारसंहिताच्या काळात अनधिकृत बांधकाम होणार नाहीत याकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे. त्याचबरोबर या बांधकामांना अभय देणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याचे संकेत देखिल आयुक्त देतील, अशी शक्यता काही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. शहरात अनधिकृत बांधकामे होणार नाहीत याची दक्षता घेण्याबाबत आयुक्त अधिकाऱ्यांना सूचना करण्याची शक्यता आहे.