स्कुल बसला आग; धूर निघताच १६ विद्यार्थ्यांना बाहेर काढले

वाहतूक पोलिसांचे प्रसंगावधान

ठाणे : शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी सोडणाऱ्या स्कुल बसने ठाण्यातील तीन हात नाका सिग्नलआधी पेट घेतला. बसमधून येणारा धूर पाहून चालकाने बस रस्त्याच्या कडेला उभी केली. यावेळी कर्तव्यावर हजर असलेल्या वाहतूक पोलिसांनी पेटत्या बसमधून आधी विद्यार्थ्यांना बाहेर काढले.

ऐरोली येथील न्यू होरायझन पब्लिक स्कुलची बस घेऊन चालक किरण पाटील पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांना घरी सोडण्यासाठी जात होते. तीन हात नाका येथील ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालय परिसरात राहणाऱ्या या विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी बस पूर्व द्रुतगती महामार्गावरून जात असताना अचानक बोनेटमधून धूर येऊ लागला. काही क्षणात बसने पेट घेतला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. यावेळी तीन हात नाका सिग्नलजवळ कर्तव्यावर हजर असलेल्या वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त संजय वेर्णेकर व नौपाडा वाहतूक शाखेचे श्रीकांत शिंदे यांनी कर्मचाऱ्यांसह बसजवळ धाव घेतली. यावेळी १६ विद्यार्थ्यांसह चालक, क्लिनर अशा १८ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

घटनास्थळी ठाणे पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी एक फायर इंजिन आणि एक रेस्क्यू वाहनसह धाव घेतली. त्यांनी बसची आग आटोक्यात आणली. दुसऱ्या बसने या विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आल्याची माहिती ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली.