शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश
शहापूर : हिंदूहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरील वाशाळा येथील बोगद्याला दिलेले ‘कसारा बोगदा’ हे नाव हटवून त्याचे आता वाशाळा बोगदा असे नामकरण करण्यात आले आहे.
याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष कुलदीप धानके यांनी संबंधित विभागाकडे लेखी मागणी केली होती. हिंदूहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी वाशाळा येथील भूमिपुत्र शेतकऱ्यांच्या जमिनी हस्तांतरित करण्यात आल्या असून हा बोगदा महसुली गाव असलेल्या वाशाळा गावातून जात आहे. मात्र या बोगद्याला जाणीवपूर्वक कसारा बोगदा असे नाव देण्यात आले होते. तथापी कसारा हे नाव हटवण्याची मागणी करुन त्या ठिकाणी वाशाळा बोगदा हे नाव देण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष कुलदीप धानके यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्याकडे केली होती. विशेष म्हणजे कसारा हे गांव महामार्गापासून जवळ जवळ सात किलोमीटर अंतरावर असताना हे नाव जाणीवपूर्वक दिल्याचा आरोप श्री. धानके यांनी केला होता. त्यांच्या निवेदनाची दखल घेत आता कसाराऐवजी वाशाळा बोगदा असे नामकरण करण्यात आले आहे.