राज्यभरात सावरकर गौरव यात्रा सुरु करणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

मुंबई: राज्यभरात सावरकर गौरव यात्रा सुरू करण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या स्वा. सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर संपूर्ण राज्यभरात राजकीय वातावरण तापलं आहे.

राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान केल्याचे सांगत भाजप आणि शिवसेना आक्रमक झाली आहे. याचदरम्यान आज सावरकरांच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिषद घेतली. यावेळी बोलताना शिंदे यांनी ही घोषणा केली आहे. ते म्हणाले की, ”स्वा. सावरकर यांचा त्याग, त्यांचे देशाप्रती असलेल्या समर्पणाच्या निमित्त राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात सावरकर गौरव यात्रा सुरू करणार आहे.

राहुल गांधी यांच्यावर टीका करत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, स्वा. सावरकर यांचा वारंवार अपमान राहुल गांधी यांच्याकडून होत आहे. याचा मी जाहीर निषेध करतो. सावरकरांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. देशासाठी आंदोलन करताना त्यांनी काळ्यापाण्याची शिक्षा भोगली. त्यांच्या त्यागातून देशाला स्वातंत्र्य मिळाले असून याचा उपभोग आपण सगळे घेत आहोत. त्यामुळे या देशात लोकशाही आहे. लोकशाहीत प्रत्येकाला आपल्या पद्धतीने वावरण्याचा आणि निर्णय घेण्याचा अधिकार मिळाला. ज्या देशभक्तांनी यासाठी त्याग केला, त्यांचा जाणीवपूर्वक अपमान केला जात असून याचा निषेध संपूर्ण देशभरात होत आहे.

या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक संयुक्त निवेदन जारी केले आहे. ज्यात ते म्हणाले आहेत की, ”स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्वातंत्र्यसमराव्यतिरिक्तही अनेक क्षेत्रात अत्यंत मोलाचे योगदान दिले. जाती निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, मराठी भाषेचा गौरव, मराठी भाषेला अनेक शब्द देण्याचे काम त्यांनी केले. कितीतरी क्षेत्रात त्यांनी योगदान दिले. प्रत्येक देशवासी त्यांच्या अतुलनीय योगदानाचा ऋणी आहे. संपूर्ण देश आणि विशेषतः महाराष्ट्र त्यांचे योगदान कधीच विसरू शकणार नाही. काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्यावर कायद्यानुसार कारवाई झाली असताना त्यांचा अत्यंत हिरीरीने बचाव करताना उद्धव ठाकरे आणि त्यांचे आमदार दिसून आले. असे करताना त्यांना वीर सावरकर यांचा अपमान दिसला नाही. हा उद्धव ठाकरे आणि त्यांच्या आमदारांच्या शरणागतीचा परमोच्च बिंदू होता.