ठाणेवैभव क्रिकेट करंडक
ठाणे: प्रज्वल राय याच्या दमदार ८१ धावा आणि दुर्वेश पाटीलने ३३ धावांत घेतलेले चार बळी याच्या जोरावर सॅटेलाईट डेव्हलपर्स संघाने टेलिपरफॉर्मन्स संघाला अस्मान दाखवले.
ठाणेवैभव आंतर कार्यालयीन क्रिकेट करंडक स्पर्धेच्या ब गटात झालेल्या सामन्यात सॅटेलाईट डेव्हलपर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. हा निर्णय योग्य ठरवताना सॅटेलाईटच्या प्रज्वल राय याने १२ चौकार आणि एक षटकार ठोकत ८१ धावा कुटल्या. तर विकी डलगच ३३, निर्दोष यादव आणि शमित शेट्टी यांच्या प्रत्येकी २४ धावा आणि विशाल यादव याने नाबाद २६ धावा करत संघाला चांगल्या स्थितीत नेले. सॅटेलाईट डेव्हलपर्स संघाने ३५ षटकांत आठ गड्यांच्या बदल्यात २३८ धावा केल्या. टेलिपरफॉर्मन्सकडून जैनेश पटेल आणि कुणाल सोनार यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले तर शशांक मिस्त्री याने एक गडी बाद केला.
टेलिपरफॉर्मन्स संघ मात्र ३५ षटकांत १४५ धावाच करू शकला. यासाठी संघाला नऊ गडी खर्ची घालावे लागले. एकमेव जैनेश पटेल याच्या ४९ धावा वगळल्या तर एकाही फलंदाजाला चमक दाखवता आली नाही. सॅटेलाईट डेव्हलपर्सकडून दुर्वेश पाटील याने ३३ धावांच्या बदल्यात टेलिपरफॉर्मन्सचे चार गडी बाद केले तर शमित शेट्टी याने दोन गडी बाद केले.