नागरिकांना मिळणार अचूक फेरफार नोंदी असलेला सातबारा

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील जमिनीच्या फेरफार नोंदी आता संगणकीकृत होत असून या ई-फेरफार नोंदीनुसार जिल्ह्यातील नागरिकांना अचूक सातबारा उतारा देण्यासाठी येत्या 22 किंवा 23 नोव्हेंबर रोजी तालुकास्तरावर विशेष शिबिर कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिले आहे.

डिजिटल इंडिया भूमीअभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमाअंतर्गत ठाणे जिल्ह्यात ई-फेरफार नोंदीचे काम सुरू आहे. ई-फेरफार प्रणालीमुळे जनतेला अचूक ऑनलाईन सातबारा व आठ अ उतारा मिळणार आहे. महाराष्ट्र शासनाकडून सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा दरम्यान फेरफार नोंदींचे काम पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले होते. त्यानुसार 5 नोव्हेंबर 2022 पर्यंत या नोंदींचा निपटारा करण्याच्या सूचना महसूल प्रशासनाला देण्यात आल्या होत्या. या करीता ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुकास्तरावर 22 किंवा 23 नोव्हेंबर रोजी विशेष कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश सर्व तहसीलदार यांना देण्यात आले आहेत.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपजिल्हाधिकारी यांची तालुकानिहाय समन्वय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यानुसार संबंधित उपजिल्हाधिकारी यांनी समन्वय अधिकारी म्हणून या कामकाजाचे यशस्वीरित्या संनियंत्रण व अंमलबजावणी करण्याचे अनुषंगाने तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठी यांच्यासमवेत आढावा बैठक घेऊन योग्य प्रकारे नियोजन करण्याबाबत देखील सूचित करण्यात आले
असल्याचे जिल्हाधिकारी श्री. शिनगारे यांनी सांगितले आहे.

या मोहिमेत नागरिकांना अचूक नोंदी असलेला ऑनलाईन गाव नमुना नं. सातबारा उतारा मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या जमिनींच्या नोंदीची अद्ययावत माहिती मिळणार आहे. यासाठी अधिकाधिक नागरिकांनी तालुका स्तरावरील शिबीर कार्यक्रमांचा लाभ घेण्यासाठी त्यामध्ये सहभागी होणेबाबत जिल्हाधिकारी श्री. शिनगारे यांनी जिल्ह्यातील नागरिकांना जाहीर आवाहन केले आहे.