सफायर लाईफ सायन्स कंपनीला भीषण आग; कामगार सुखरूप

पालघर : पालघर औद्योगिक वसाहतीतील सफायर लाईफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला आज दुपारी दोनच्या सुमारास भीषण आग लागली. या औषध निर्मिती कंपनीतील कामगार सुखरूप असले तरी कंपनी आगीतजक जळून खाक झाली आहे.

पालघर बोईसर मार्गावरील महाराष्ट्र औद्योगिक वसाहतमध्ये आज दुपारी दोन वाजल्याच्या सुमारास सफायर लाइफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड या औषध निर्मिती करणाऱ्या कंपनीला अचानक आग लागली. साडेतीन वाजताच्या सुमारास या कंपनीतील ज्वलनशील रसायन साठवणूक केलेल्या ड्रम व सिलेंडरचे स्फोट झाल्याने या आगीने भीषण रूप घेतले व आग कंपनीभर पसरली. ही आग वीजविण्याकरिता अग्निशामन गाड्या बोलावण्यात आले असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू होते.

कंपनीला आग लागताच कंपनीमधील सर्व कामगार बाहेर पडल्याचे सांगण्यात आले. यामुळे जीवितहानी झाल्याची शक्यता कमी असली तरीही कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पालघर शहराच्या अग्निशामक दलाची गाडी वाडा येथे गेली असल्याने तारापूर औद्योगिक वसाहतीमधील अग्निशामक दलाला पाचरण करण्यात आले. मात्र ही अग्निशमन व्यवस्था कार्यान्वित होईपर्यंत दुपारचे साडेतीन पावणे चार वाजल्याने आगीने रौद्ररूप धारण केले होते. कंपनीमध्ये असणाऱ्या ज्वलनशील सॉल्व्हेंट ड्रमचे किमान ३०-३५ स्फोट झाले असून आग विझवण्यासाठी तारापूर औद्योगिक वसाहतीमधील दोन व पालघर अग्निशामक दलाचा एक बंब प्रयत्नशील होता.