संत सावळाराम महाराज क्रीडा संकुलाचे लवकरच रूप पालटणार

* विकासासाठी ५० कोटी रुपयांचा निधी
* खंबाळपाडा मैदानात १५ कोटीतून सुविधा उभ्या राहणार

कल्याण : ह.भ.प. संत सावळाराम महाराज क्रीडा संकुलाचे लवकरच रूप पालटणार असून क्रीडा संकुलाच्या विकासासाठी ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तर खंबाळपाडा मैदानात १५ कोटीतून सुविधा उभ्या राहणार असल्याने खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघात मागील दहा वर्षाच्या कालावधीत विविध शहरांमध्ये अनेक क्रीडा सुविधा उभ्या राहिल्या असतानाच आता डोंबिवली येथील ह.भ.प. संत सावळाराम महाराज क्रीडा संकुलाचा विकास दृष्टीपथात आला आहे. या संकुलाच्या विकासासाठी राज्य शासनाकडून तब्बल ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. या निधीच्या माध्यमातून संकुलात इनडोअर आणि आऊटडोअर खेळांच्या अत्याधुनिक सुविधा उभारण्यात येणार आहे. यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील खेळाडूंना विविध खेळांच्या सरावासाठी अत्याधुनिक सुविधांनी आणि साहित्यांनी सुसज्ज असे हक्काचे क्रीडा संकुल उपलब्ध होणार आहे. तर खंबाळपाडा येथील मैदानात क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी १५ कोटींचा निधी उपलब्ध झाला होता. त्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरूवात होत असून त्यामुळे येथेही खेळाडूंना सुविधा देणे सोपे होणार आहे.

डोंबिवली येथील ह. भ. प. संत सावळाराम महाराज क्रीडा संकुलाचा विकास दृष्टीपथात आला आहे. डोंबिवली शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या क्रीडा संकुलात संपूर्ण जिल्ह्यातून खेळाडू विविध मैदानी खेळांच्या सरावासाठी येत असतात. याच खेळाडूंना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे सातत्याने प्रयत्नशील होते. यासाठी शासनाकडे भरीव निधीची मागणी देखील त्यांनी केली होती. त्यांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या क्रीडा संकुलाच्या विकासासासाठी तब्ब्ल ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

या निधीच्या माध्यमातून क्रीडा संकुलात विविध अत्याधुनिक सुविधांची उभारणी करण्यात येणार आहे. तर इंडोअर आणि आऊटडोर स्टेडियम उभारले जाणार असून यामध्ये क्रिकेट, टेबल टेनिस यांसह विविध खेळांचे अत्याधुनिक साहित्य उपलब्ध असणार आहे. यामुळे केवळ कल्याण डोंबिवली नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातून या ठिकाणी येणाऱ्या खेळाडूंना विविध खेळांच्या सरावासाठी एक हक्काचे ठिकाण उपलब्ध होणार आहे.