ठाणे: काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यात शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी संजय निरुपम हे प्रवक्ते म्हणून पक्षात काम करतील असे मुख्यमंत्री म्हणाले.
काँग्रेस पक्षाच्या सदस्यपदाचा राजीनामा देऊन शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झालेल्या संजय निरुपम यांच्या प्रवेशानंतर मुख्यमंत्र्यांनी निरुपम यांचे जाहीर अभिनंदन केले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, संजय निरुपम यांना लोकसभा लढवायची होती. त्यांनी माझ्याबरोबर चर्चा देखील केली होती. परंतु त्यांना उमेदवार निश्चित झाल्याचे सांगण्यात आले. पक्षासाठी आपण काम करावे असेही सांगण्यात आले. त्यांनी तशी तयारी देखील दर्शविली आणि आता प्रवक्ते तसेच समन्वयक म्हणून काम पाहतील असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. पक्षात येताना त्यांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता प्रवेश केला असून यासाठी मी त्यांचे कौतुक करतो असेही मुख्यमंत्री म्हणाले.
२० वर्षानंतर मी आज आपली पत्नी आणि इतर पदाधिकाऱ्यांसमवेत स्वगृही परतलो असल्याची प्रतिक्रिया संजय निरुपम यांनी दिली. कॉंग्रेसमध्ये असतांनाही बाळासाहेबांच्या विचारानुसारच काम करीत होतो असेही त्यांनी सांगितले. कॉंग्रेसमध्ये दगाबाजी झाली, मला लोकसभा लढवायची होती. मात्र आता शिंदे यांचे हात मजबुत करायचे असल्याने त्यांच्यासाठी काम करेन असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कल्याणमध्ये उद्धव सेनेला पराभव दिसत आहे. त्यात त्यांनाच त्यांच्या उमेदवारावर विश्वास नसल्याचेही दिसत आहे. त्यामुळे त्यांनी आणखी एक उमेदवार उभा केला आहे. त्यांनी दोन काय किंवा आणखी १० उमेदवार उभे केले तरी देखील कल्याणमधून डॉ. श्रीकांत शिंदे हेच निवडून येतील,असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. खरी शिवसेना, धनुष्यबाण, बाळासाहेबांचे विचार हे आमच्याकडे आहेत. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव देखील घेण्याचा अधिकार उध्दव ठाकरे यांना नसल्याचे त्यांनी सांगितले.