राहुल गांधींविरोधात बदनामीचा खटला प्रकरण
भिवंडी : काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात बदनामीचा खटला दाखल करणारे संघ स्वयंसेवक राजेश कुंटे यांना एक हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. या आधीदेखील कुंटे यांना 500 रुपयांचा दंड ठोठावला होता. मात्र, हा दंड त्यांनी अद्याप भरला नाही. दरम्यान, कोर्टाने दंड ठोठावला असला तरी मूळ खटला सुरूच राहणार असल्याचे राजेश कुंटे यांनी सांगितले.
राहुल गांधी यांनी 2014 मधील एका सभेत महात्मा गांधी यांच्या हत्येसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जबाबदार असल्याचे म्हटले होते. राहुल यांच्या या वक्तव्यामुळे संघाची बदनामी झाल्याचा खटला भिवंडी कोर्टात दाखल करण्यात आला. राहुल गांधी याआधीच कोर्टात हजेरी लावत गुन्हा कबूल नसल्याचे म्हटले होते. त्यानंतर 2018 मध्ये कोर्टाने त्यांच्याविरोधात आरोप निश्चित केले. याचिकाकर्ते राजेश कुंटे यांनी हा खटला स्थगित करण्यासाठी अर्ज दाखल केला होता. हा अर्ज कोर्टाने फेटाळून लावला आणि एक हजार रुपयांचा दंड ठोठावला.
याचिकाकर्त्यांनी म्हटले की, मॅजिस्ट्रेट कोर्टाच्या आदेशाविरोधात त्यांची एक रिट याचिका मुंबई हायकोर्टात प्रलंबित आहे. त्यामुळे हा खटला स्थगित करावा अशी विनंती केली. याचिकाकर्ते कुंटे यांनी म्हटले की, या प्रकरणातील एका साक्षीदाराला कोर्टात हजर करू इच्छितो. मात्र, काही कारणास्तव कोर्टाने याला परवानगी दिली नाही. त्यानंतर मॅजिस्ट्रेट कोर्टाच्या या निर्णयाविरोधात कुंटे यांनी हायकोर्टात धाव घेतली. याचिकाकर्त्यांनी भिवंडीतील निजामपूर पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याला कोर्टात हजर करण्याची परवानगी मागितली होती. या पोलिसाने राहुल गांधी यांच्या वक्तव्याशी संबंधित फाइल तयार केली होती. मात्र, राहुल गांधी यांच्या वकिलाने याला विरोध केला. त्यानंतर मॅजिस्ट्रेट जे.व्ही. पालिवाल यांनी म्हटले की, तक्रारदाराचे सर्व म्हणणं ऐकून घेतल्यानंतर या कर्मचाऱ्याची साक्ष घेणे योग्य राहील.