ज्येष्ठ नागरिकांच्या उत्साहाला सलाम

Thanevaibhav Online

16 October 2023

पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांच्याकडून कौतुक

श्री रामकृष्ण नेत्रालय आणि ‘ठाणेवैभव’ आयोजित ज्येष्ठोत्सव

ठाणे: ठाणेवैभव आणि श्री रामकृष्ण नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांच्या कला गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी ज्येष्ठोत्सव हा कार्यक्रम डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात शुक्रवारी सायंकाळी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला २३ जेष्ठ नागरिक संघ आणि २०० पेक्षा अधिक ज्येष्ठांनी हजेरी लावली.

गायन, उखाणा, अभिवाचन, नृत्य अशा विविध स्पर्धा ज्येष्ठांसाठी या कार्यक्रमांतर्गत घेण्यात आल्या. या स्पर्धेला प्रमुख पाहुणे पोलीस उपायुक्त (गुन्हे) शिवराज पाटील, मनसेचे ज्येष्ठ नेते आणि दिग्दर्शक अभिजित पानसे, प्रारंभ संस्थेच्या समाजसेविका आणि लेखिका अरुंधती भालेराव, श्री रामकृष्ण नेत्रालयचे डॉ. सुहास आणि डॉ. नितीन देशपांडे तसेच ‘ठाणेवैभव’चे संपादक मिलिंद बल्लाळ उपस्थित होते.

आम्ही ज्येष्ठांच्या सुरक्षेसाठी सतत वेगवेगळ्या योजना राबवत असतो. आज या कार्यक्रमामुळे आम्हाला सर्व ज्येष्ठ नागरिक एकत्र भेटल्यामुळे आमच्या योजना आम्हाला अधिक प्रभावीपणे लोकांपर्यंत पोचवता येतील आणि आपले ज्येष्ठ नागरिक अधिक सुरक्षित आहेत याचा मला आनंद आहे, असे मत पोलीस उपायुक्त श्री. पाटील यांनी व्यक्त केले.

ज्येष्ठांची ऊर्जा पाहून मी थक्क झालो आहे. ठाण्याच्या संस्कृतीत ज्येष्ठांचे मोठे योगदान आहे, हे आज या कार्यक्रमानिमित्त पुन्हा एकदा पाहायला मिळाले, असे मत दिग्दर्शक पानसे यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमात ठाण्यातील ज्येष्ठ नागरिक संघ मध्यवर्ती समिती, सिनिअर सिटीझन्स क्लब, ठाणे (नॉर्थ), सन्मित्र सिनिअर सिटीझन्स असोसिएशन, श्रीनगर ज्येष्ठ नागरिक संघ, ज्येष्ठ नागरिक संघ, कळवा, ऋतुपार्क ज्येष्ठ नागरिक सेवा संस्था, ठाणे (प), आनंदविहार ज्येष्ठ नागरिक संघ-ठाणे (पू), चिंतामणी-गावंडबाग ज्येष्ठ नागरिक संस्था, शिवशक्ती ज्येष्ठ नागरिक संस्था, उत्तरायण सिनिअर सिटीझन्स असोसिएशन, कशिशपार्क ज्येष्ठ नागरिक सेवा संस्था, सांजस्नेह ज्येष्ठ नागरिक संघ, दोस्ती इम्पेरिया सिनिअर सिटीझन्स ग्रुप, एव्हरेस्ट वर्ल्ड लाफ्टर क्लब, शिवाई ज्येष्ठ नागरिक संस्था, सुप्रभात ज्येष्ठ नागरिक संघ, ब्रह्मांड कट्टा, ओंकार ज्येष्ठ नागरिक संघ, सावली सिनिअर सिटीझन्स असोसिएशन, लुईसवाडी ज्येष्ठ नागरिक संस्था, विकास कॉम्प्लेक्स ज्येष्ठ नागरिक संघ, रश्मी ज्येष्ठ नागरिक संघ या सर्व सक्रिय ज्येष्ठ नागरिक संघांचा यावेळेस सत्कार करण्यात आला. त्यांच्यावर आधारित एका विशेष पुरवणीचे प्रकाशन या निमित्ताने मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पुरवणीचे संकलन प्रशांत असलेकर यांनी केले.

ज्येष्ठ नागरिकांनी उत्तम सादरीकरण केले. त्यांचा उत्साह प्रचंड आहे. ज्येष्ठांशिवाय आपले आयुष्य अपूर्ण आहे. ते सर्व तरुणांसाठी एक आदर्श आहेत, असे मत प्रारंभच्या अरुंधती भालेराव यांनी व्यक्त केले.

ठाण्यासाठी सतत काहीतरी उपक्रम करण्यासाठी आमची धडपड असते. ज्येष्ठांनी कायम आम्हाला संधी दिली, व्यासपीठ दिले. आता त्यांना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो, असे मत श्री रामकृष्ण नेत्रालयचे डॉ. नितीन देशपांडे यांनी व्यक्त केले. पुढेही असेच कार्यक्रम ठाण्याचे मुखपत्र असलेले ‘ठाणेवैभव’शी संलग्न आम्ही करत राहू, असे ते पुढे म्हणाले.

कोणताही कार्यक्रम ज्येष्ठांच्या आशीर्वादाशिवाय यशस्वी होऊ शकत नाही, याची प्रचिती आज पुन्हा एकदा आपल्याला या कार्यक्रमानिमित्त आली. ५० पेक्षा अधिक सादरीकरण वेळेत पूर्ण होणे हे ज्येष्ठांच्या शुभेच्छा असल्याशिवाय शक्य नाही. त्यांचा उत्साह तर कौतुकास्पद आहेच, पण त्यांच्या शिस्तबध्द जीवनशैलीचे सर्वांनी अनुकरण केले पाहिजे. ‘ठाणेवैभव’ सध्या ४९ व्या वर्षात कार्यरत आहे. ‘ठाणेवैभव’ देखील या पिढीसोबत ज्येष्ठ झाला मात्र ठाणेकरांच्या प्रेमामुळे या संस्थांसारखाच चिरतरुण राहिला आहे, असे मत ‘ठाणेवैभव’चे संपादक मिलिंद बल्लाळ यांनी व्यक्त केले.

गायनाचे परीक्षण सुप्रसिध्द गायक प्रशांत काळूंद्रेकर आणि प्राध्यापिका आणि गायिका वृंदा कुलकर्णी यांनी केले तर नृत्याचे परीक्षण नृत्य शिक्षिका श्रद्धा पिंपळे यांनी केले.

द्वंद गायनाचे पहिले, दुसरे आणि तिसरे पारितोषिक अनुक्रमे मोहन गुरबानी-मनोज कुमार डांगे, मनिषा रानडे-अपर्णा वाडदेकर आणि मीरा वेलिंग-अविनाश जाधव यांनी पटकावले. तर एकल गायन स्पर्धेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक अनुक्रमे एस पी चौधरी, राघवेंद्र ओडेयार आणि दिलीप निमकर यांनी मिळवला. एकल नृत्यचे पहिले पारितोषिक कांचनमाला मोहिते यांनी तर सामूहिक नृत्याचे पहिले पारितोषिक सुलभा केवडकर ग्रुप यांनी जिंकले. उखाणा स्पर्धेचे पहिले पारितोषिक मंगला जोशी यांनी मिळवले.

आजच्या कार्यक्रमानंतर सर्व आजी आजोबांचे प्रमोशन झाले आहे. त्यांना आपण ताई, दादा म्हणूनच हाक मारली पाहिजे. पहिल्यांदाच आम्ही असा उपक्रम ज्येष्ठ नागरिकांसाठी केला आहे आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद प्राप्त झाला याचा आम्हाला अभिमान आहे, असे मत ‘ठाणेवैभव’चे व्यवस्थापकीय संपादक निखिल बल्लाळ यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे नियोजन निखिल बल्लाळ आणि शर्मिला इनामदार यांनी केले तर सूत्रसंचालन प्राध्यापिका साधना जोशी यांनी केले. या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांनी विविध वाद्य, मॅजिक शो अशा अनोख्या कार्यक्रमांचे सादरीकरण केले.