नवी दिल्ली : माजी विजेती सायना नेहवाल, जागतिक कांस्यपदक विजेता लक्ष्य सेन आणि पुनरागमन करणारा एचएस प्रणॉय यांनी दिमाखदार विजयांसह इंडिया खुल्या बॅडिमटन स्पर्धेची बुधवारी दुसरी फेरी गाठली. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीनेही पुरुष दुहेरीत विजयी अभियान सुरू केले आहे.
महिला एकेरीत दुखापतींमुळे गतवर्षी अनेक स्पर्धामध्ये सहभागी होऊ न शकलेली माजी जागतिक अग्रस्थानावरील बॅडिमटनपटू सायनाने चेक प्रजासत्ताकच्या तेरेझा स्व्हाबिकोव्हाविरुद्ध सरशी साधली. या सामन्यात २०-२२, ०-१ अशा पिछाडीवर असलेल्या तेरेझाने पाठीच्या दुखापतीमुळे हा सामना अर्धवट सोडला. चौथ्या मानांकित सायनाची दुसऱ्या फेरीत मालविका बनसोडशी गाठ पडणार आहे. मालविकाने समिया इमान फारूखीचा २१-१८, २१-९ असा पाडाव केला. आकर्षी कश्यपने अनुरा प्रभुदेसाईविरुद्ध २१-१४, २१-१४ असा विजय मिळवला.