हिरानंदानी इस्टेट परिसरातील खाडीकिनारी पोलिसांचा नऊ तास शोध
ठाणे: अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराला ठाण्यातील हिरानंदानी परिसरातील खाडीकिनारी असलेल्या कांदळवनामधून अटक करण्यात आली. तब्बल नऊ तास पोलिसांची पथके या हल्लेखोराचा खाडीकिनारी शोध घेत होते. आरोपी बांगलादेशी नागरिक असल्याचे बोलले जात आहे.
काही वेळेपुरता हल्लेखोराने आपला मोबाईल सुरु केला आणि मोबाईलचे नेटवर्क कांदळवन परिसरात असल्याचे पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर पोलिसांनी आपला मोर्चा खाडी किनाऱ्यावरून कांदळवनाकडे वळवला. अखेर या ठिकाणी हल्लेखोर पोलिसांना मिळाला. पुढच्या चौकशीसाठी या हल्लेखोराला मुंबई पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोबाईल टॉवर लोकेशनच्या मदतीने हल्लेखोराचा शोध घेण्यात आला. आरोपी मोहम्मद सज्जद याचे टॉवर लोकेशन वडवली पोलीस स्टेशन हद्दीत हिरानंदानी इस्टेटमध्ये मिळाले होते. आरोपी काही वर्षांपूर्वी हिरानंदानी परिसरात मजूर म्हणून काम करत होता. त्याला या परिसराची चांगली माहिती होती. आरोपीला हिरानंदानी कामगार छावणीजवळ अटक करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे या परिसरात आरोपी दोन दिवस लपून राहिला होता. हा संपूर्ण परिसर ठाण्यातल्या अति महत्त्वाच्या अशा हिरानंदानी इस्टेटमधील लेबर कॅम्पचा परिसर आहे. या ठिकाणी सहजासहजी कोणीही जात येत नाही. त्यामुळे या परिसरातील सुरक्षा व्यवस्थेच्या त्रुटी समोर आल्या आहेत.
अभिनेता सैफ अली खान याच्या घरामध्ये शिरून या हल्लेखोराने चाकूहल्ला केला होता. मागील तीन दिवसांपासून मुंबई पोलिसांचे पथक हल्लेखोराचा शोध घेत होते. काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले होते. त्याचा चेहरा हल्लेखोराशी मिळता-जुळता होता. परंतु तो आरोपी नसल्याने पोलिसांनी त्याला सोडून दिले होते. त्यानंतर पुन्हा सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. दरम्यान, घोडबंदर येथील हिरानंदानी इस्टेट भागात असलेल्या एका कामगारांच्या छावणीमध्ये तो लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर मुंबई आणि ठाण्यातील कासारवडवली पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. परंतु छावणीमध्ये तो आढळून आला नाही. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्याचा तपास करण्यास सुरूवात केली. त्यावेळी तो येथील कांदळवन परिसरात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी कांदळवन भागामध्ये असलेल्या एका तरुणाची मदत घेतली. पंरतु हल्लेखोराने मोबाईल बंद करून ठेवला होता. त्यामुळे त्याचा कांदळवनातील जंगलामध्ये शोध लागणे कठीण झाले होते. मध्यरात्री त्याने त्याचा मोबाईल काही वेळासाठी सुरू केला. त्यानंतर पोलिसांना त्याचा शोध लागला. पुढील चौकशीसाठी त्याला मुंबई पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
येथील शिवसेनेचे पदाधिकारी प्रवीण नागरे यांनी परिसरातील लेबर कॅम्प आणि हंगामी बांधकाम कामगार वसाहतींमध्ये बांगलादेशी नागरिक बेकायदेशीरपणे मोठ्या संख्येने राहत असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. लवकरच पोलिसांनी त्यांना हुडकून काढणारी मोहीम हाती घेतली तर भविष्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण येईल, असे मत व्यक्त केले.