ठाणे – ठाणे महापलिकेचे ढोल ताशे अजून वाजायला सुरुवातही झाली नाही तो महापालिकेवर भगवा फडकला आहे. महापालिका भवनाच्या दर्शनी भिंतीवर दोन भगवे ध्वज अवतरले असून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून धुसफूस सुरु आहे. महाविकास आघाडीत त्यामुळे तणाव निर्माण झाला आहे. शिवराज्याभिषेकावरील शिल्पचित्राचे नुकतेच नुतनीकरण झाले असून त्याला लागूनच नव्याने दोन भगवे झेंडे लावण्यात आले आहेत. यावर विरोधक आक्षेप नोंदविण्याच्या विचारात असताना मुख्य प्रवेशद्वारावर वाघाचे चित्र देखील रेखाटण्यात आले आहे. या दोन्ही बाबी सूचक असल्याची कुजबुज ऐकू येत आहे. महापलिकेच्या स्थापनेपासून शिवसेनेचा भगवा झेंडा फडकत आला असून या खेपेस महाविकास आघाडीमुळे सत्ता आली तरी भगव्याची किंमत कमी होऊ नये यासाठी केलेले ही योजना आहे असेही बोलले जात आहे.
ठाणे महापालिकेवर मागील ३० वर्ष सेनेची सत्ता आहे परंतु भगवा झेंडा लावण्याचे धाडस कोणीही केले नव्हते. परंतु महापौर नरेश म्हस्के यांनी ते करून दाखवले असून आगामी महापालिका निवडणुकीत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा सत्ता येणार असे सूचित करण्याचा हा प्रयत्न असल्याचे एका भाजपा पदाधिकाऱ्याने म्हटले.
भगवा झेंडा हे हिंदवी स्वराज्याचे प्रतिक आहे. हा भगवा ध्वज लावण्यात आला असला तरी, त्यात राजकारण आणू नये. जे लोक संबंध जोडत असतील त्याला आमचा नाईलाज आहे, असे महापौर नरेश म्हस्के म्हणाले.