एस. व्ही. जोशी शाळेच्या संकेतस्थळाचे उद्घाटन

प्रगतीचे शिखर गाठण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्राणवायू हवा – बल्लाळ

डोंबिवली : शिखर गाठायचे तर गिर्यारोहकांप्रमाणे पाठीवर प्राणवायू वहावा लागणार. आधुनिक युगात प्रगतीचे शिखर गाठण्यासाठी तंत्रज्ञानाच्या प्राणवायूला पर्याय नाही, असे मत ठाणेवैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ यांनी काढले.

येथील ८५ वर्षे जुन्या स. वा. जोशी विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या संकेतस्थळाचे उद्दघाटन श्री. बल्लाळ यांच्या हस्ते झाले. तेव्हा ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जनरल एज्युकेशन इन्स्टिट्युटचे अध्यक्ष डॉ. उल्हास कोल्हटकर होते. डोंबिवलीच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या स. वा. जोशी विद्यालयाच्या या संकेतस्थळामुळे जगभरात पसरलेले माजी विद्यार्थी जोडले जातील असे सांगून श्री. बल्लाळ म्हणाले की, संकेतस्थळासारखे उपक्रम हे काळाची गरज बनले असून ब्राण्डिंग, संवाद, माहितीचे प्रसारण आणि उपक्रमांबाबतची माहिती समाजाला तत्काळ उपलब्ध होऊ शकते असे ते म्हणाले.

संस्थेच्या एकूण ४५ शैक्षणिक संस्था असून प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात ठसा उमटवला आहे, अशी माहिती डॉ. कोल्हटकर यांनी दिली. ऐतिहासिक अशा या संस्थेच्या माध्यमातून भविष्याचा वेध घेण्याचे काम सुरु आहे. संस्थेतर्फे भाषा, रोबोटिक, गॅस्ट्रोनॉमी आदी प्रयोगशाळा सुरु करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. अशी सुविधा डोंबिवलीत प्रथमच उपलब्ध होत आहे. संस्थेचे उपाध्यक्ष प्रदीप गोसावी यांनी संस्थेच्या भावी योजनांबद्दल माहिती दिली. ‘ब्लॉसम’ या इंग्रजी माध्यमातील सीबीएससी शाळेला मिळत असलेला प्रतिसाद उत्साहवर्धक आहे, असे सांगितले.

यावेळी वेबसाईट डिझायनर मुकेश विसपुते, ज. ए. इ. अध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष उल्हास कोल्हटकर, उपकार्याध्यक्ष प्रदीप गोसावी, कार्यवाह प्रकाश अधटराव, प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका समता पावसकर, माध्यमिक विभाग मुख्याध्यापिका ज्योती लोहार, वेबसाईट डिझायनर मुकेश विसपुते तसेच संस्थेचे संचालक आणि मुख्याध्यापक उपस्थित होते. सुत्रसंचालन तेजल उपाध्ये यांनी केले तर वंदे मातरम कल्याणी शितूत यांनी गायले.