जिल्ह्यात नऊ ठिकाणी होणार ग्रामीण कौशल्य विकास केंद्रे

Thanevaibhav Onlline

17 October 2023

प्रधानांच्या हस्ते गुरुवारी ऑनलाईन उद्घाटन

ठाणे: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणाऱ्या प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचा ऑनलाईन उद्घाटन कार्यक्रम येत्या 19 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

ठाणे जिल्ह्यातील नऊ ग्रामपंचायतींमध्ये प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र स्थापन होणार आहेत. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसंदर्भात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कौशल्य, उद्योजकता विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे आढावा घेतला.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने राज्यात 511 कौशल्य विकास केंद्रांची स्थापना होणार आहे. या केंद्राचा उद्घाटन सोहळा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवार, 19 ऑक्टोबर 2023 रोजी सायंकाळी 4 वाजता ऑनलाईन माध्यमाद्वारे होणार आहे. या कार्यक्रमाचे प्रक्षेपण ठाणे जिल्ह्यातील नऊ केंद्रांमध्ये दाखविण्यात येणार आहे. यासंदर्भात आज मुख्यमंत्री श्री. शिंदे व मंत्री श्री. लोढा यांनी दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून आढावा घेतला.

ठाणे जिल्ह्यातून जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, जिल्हा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या सहाय्यक आयुक्त संध्या साळुंखे आदी उपस्थित होते.

ठाणे जिल्ह्यात भिवंडी तालुक्यातील कोन, अंबाडी, कल्याण तालुक्यातील गोवेली व कांबा, मुरबाड तालुक्यातील सरळगाव, म्हसा, शहापूर तालुक्यातील मोखावणे व वाशिंद आणि अंबरनाथ तालुक्यातील वांगणी या ग्रामपंचायतीमध्ये प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्र स्थापन होणार आहेत.

यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र ही संकल्पना राज्यातील तरुणांच्या रोजगार संधीसाठी आणि ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देणारी आहे. महाराष्ट्राच्या या अभिनव संकल्पनेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे, ही बाब देखील गौरवाची आहे. त्यामुळे हा कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी नियोजन करा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले.

मुख्यमंत्री महोदयांनी केलेल्या सूचनांप्रमाणे ठाणे जिल्ह्यात होणाऱ्या कार्यक्रमाचे योग्य नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. शिनगारे यांनी यावेळी संबंधितांना दिल्या.