उदघाटन न करताच खर्डीचे ग्रामीण रुग्णालय नविन इमारतीत सुरू

शहापूर : खर्डी ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे काम पूर्ण झाल्याने आणि उदघाटन करण्यासाठी निवडणूक आचारसंहिता आड येत असल्याने जुन्या इमारतीत रुग्ण आणि कर्मचाऱ्यांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी, खर्डी ग्रामीण रुग्णालयाच्या नविन इमारतीचे उदघाटन न करताच नविन इमारतीत 1 एप्रिल 2024 रोजी रुग्णांची तपासणी सुरू करण्यात आली असल्याने परिसरातील नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.

या रुग्णालयात उपलब्ध असलेल्या यंत्र सामग्रीमुळे अत्याधुनिक उपचार मिळणार आहेत. रुग्णालय प्रशस्त असल्याने रुग्णांना आता बसण्याची सोय करण्यात आली आहे. प्रत्येक विभागाला वेगवेगळ्या खोल्या देण्यात आल्याने गर्दीची समस्या दूर झाली आहे. लवकरच या रुग्णालयालगत ट्रॉमा केअर सेंटरचे काम सुरू होणार असल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. रुग्णालयात रुग्णांना सुविधा मिळणार असल्याने रुग्णांना दिलासा मिळाला आहे.

गेल्या 14 वर्षांपासून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीत सुरू असलेल्या एकाच छोट्याशा इमारतीत रुग्णांची तपासणी, मलमपट्टी, रुग्ण दाखल करणे व औषध निर्माता हे सर्व एकाच ठिकाणी होते तर पावसाळ्यात रुग्ण दाखल असलेल्या ठिकाणी गळके शेड असल्याने रुग्णांना पुढे पाठवण्यात येत होते तर पंखे नसल्याने ऐन उन्हाळ्यात दाखल रुग्णांना गर्मीमुळे त्रास होत होता. ह्या अडचणीमुळे कर्मचारी व रुग्णांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. रुग्णावर उपचार करून शहापूर येथील रुग्णालयात पुढे पाठवावे लागत होते. या गैरसोयीची दखल घेत शासनाने खर्डीच्या ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन इमारतीत ओपीडी सुरू केली असल्याची माहिती खर्डीचे वैद्यकीय अधिक्षक आशिलाक शिंदे यांनी दिली.

रुग्णालयात पाण्याची कमतरता असल्याने येथील रुग्णालयाच्या कर्मचारी, रुग्ण व स्वच्छतेसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत खर्डीकर यांनी केली आहे.

अपघातग्रस्त व गंभीर रुग्णावर तत्काळ उपचार मिळावेत यासाठी 11 कोटी 51 लाख रुपये खर्च करून खर्डी ग्रामीण रुग्णालय इमारत व कर्मचाऱ्यांना रहाण्यासाठी दोन इमारती बांधण्यात आल्या आहेत. रुग्णालयात 30 खाटा उपलब्ध करण्यात आल्या असून एक्सरे मशीन, एसीजी व सोनोग्राफी मशीन उपलब्ध करण्यात आली आहे.तर दिवसेंदिवस तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने सकाळच्या ओपीडीसाठी दोन डॉक्टर उपलब्ध करण्यात यावे, अशी मागणी उपसरपंच मौसीम शेख यांनी केली आहे.

प्रशासनाने रुग्णालयात उपलब्ध असलेल्या एक्सरे, सोनोग्राफी मशीनसाठी तज्ञांची नेमणूक करून एक्सरे व सोनोग्राफीची सेवा सुरू करावी, जेणेकरुन येथील गोरगरीब रुग्णांची आर्थिक कोंडी न होता वेळेवर उपचार मिळतील अशी मागणी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत घरत यांनी केली आहे.

रुग्णालयाच्या नवीन इमारतीत ओपीडीसाठी दोन डॉक्टर उपलब्ध करण्यासाठी कागदोपत्री प्रयत्न सुरू असून तज्ञ डॉक्टरची मागणी वरिष्ठांकडे करण्यात आली आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ.आशिलाक शिंदे यांनी दिली.