डोंबिवली शहराकडे आरटीओची पाठ, सर्व्हेचा फक्त दिखावा !

डोंबिवली : शहरात वाहनांची वाढती संख्या आणि अनधिकृत रिक्षा थांबे यामुळे वाहतूक कोंडीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अधिकृत रिक्षा थांबे केवळ हाताच्या बोटावर मोजता येणार इतकेच असून अनधिकृत रिक्षा थांब्यासाठी कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभागाने डोंबिवलीत अभय दिले आहे का असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. वर्षभर कधीही न दिसणारे आरटीओ अधिकारी फक्त सर्व्हेचा दिखावा करत असल्याची ओरड नागरिक करीत आहेत.
 
कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी साळवी यांनी त्यांच्या कार्यकाळात डोंबिवली शहराकडे कानाडोळा केला होता असे लोक सांगत असतानाच आता प्रभारी अधिकारी रमेश कुल्लूरकर हेही साळवी यांच्याप्रमाणे सरकारी कारभार सांभाळत असल्याने डोंबिवली शहरात आरटीओच्या कामावर नागरिक नाराज दिसत आहेत. गेल्यावर्षी डोंबिवलीत आरटीओने सर्व्हेचा दिखावा केल्याने अनेक रिक्षा संघटनांनी नाराजी व्यक्त केली होती. डोंबिवली शहरात दिवसेंदिवस अनधिकृत रिक्षा थांबे वाढत असताना त्यावर आरटीओ कारवाई न करता अभय देत आहे का असा प्रश्न डोंबिवलीकरांनी उपस्थित केला आहे. कल्याण येथील कार्यालयातून डोंबिवली शहराची चर्चा करून प्रश्न सूटत नसून प्रभारी अधिकारी रमेश कुल्लूरकर यांनी डोंबिवली शहरात एकदातरी पाहणी करणे आवश्यक आहे. वाहतूक पोलीस कारवाई करत असून आरटीओ मात्र पाठ दाखवत असल्याने आरटीओच्या कामकाजाबाबत जागरूक नागरिक बोटे मोडत असून या सावळागोंधळ कारभारावर नाराज आहेत. वाहतूक पोलिसांची कुमक कमी असल्याची सबब नेहमीच पुढे येत असते. आहे त्या वाहतूक पोलीस बळावर कारभार होत असला तरी शहरात होणारी वाहतूककोंडी कशी मोकळी होईल. छोटे रस्ते त्यात फेरीवाला आणि दुकानदारांनी काबीज केलेले पदपथ वाहतूक कोंडीला हातभार लावत असतात असा आरोपही नागरिक करीत असतात. यासाठी पालिका, पोलीस आणि वाहतूक प्रशासनाने चोख कारवाई केली तर यातून मार्ग निघेल. परंतु याकडेच एकूण प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने शहराची कोंडी होत आहे. कमीतकमी आता नव्याने पदभार स्वीकारलेल्या प्रभारी आरटीओ अधिकाऱ्यांनी डोंबिवली शहराकडे लक्ष द्यावे. त्यासाठी शहरातील सर्वच रिक्षा युनियनचे सहकार्य घ्यावे अशी मागणी डोंबिवलीकर करीत आहेत.