मध्य रेल्वेच्या आरपीएफने सहा महिन्यांत ७४५ मुलांची केली सुटका

‘आॅपरेशन नन्हे फरिश्ते’ फत्ते

ठाणे : मध्य रेल्वेच्या रेल्वे संरक्षण दलाने शासकीय रेल्वे पोलीस आणि इतर फ्रंटलाइन रेल्वे कर्मचा-यांच्या समन्वयाने केलेले ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ फत्ते झाले आहे. या अंतर्गत जानेवारी ते जून २०२२  पर्यंत म.रेल्वे स्थानके आणि फलाटांवरील तब्बल ७४५ मुलांची सुटका केली. यामध्ये ४९० मुले आणि २५५ मुलींचा समावेश आहे आणि ‘चाइल्ड लाईन’ स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने त्यांचे पालकांशी पुनर्मिलन झाले आहे.

रेल्वे सुरक्षा दलाकडे रेल्वे मालमत्ता, प्रवासी क्षेत्र आणि प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवली आहे. ऑपरेशन नन्हे फरिश्ते” अंतंर्गत मुलांना वाचवण्याची जबाबदारीही त्यांनी पार पाडली. भांडणामुळे, काही कौटुंबिक समस्यांमुळे, चांगले जीवन किंवा मुंबईसारख्या शहराचे ग्लॅमर याच्या शोधात आपल्या कुटुंबियांना न सांगता स्थानकावर येणारी मुले प्रशिक्षित आरपीएफ जवानांना आढळतात.  हे कर्मचारी मुलांशी जवळीक साधतात, त्यांच्या समस्या समजून घेतात आणि त्यांना त्यांच्या पालकांशी पुन्हा एकत्र येण्यासाठी सल्ला देतात. या सेवेबद्दल अनेक पालक या सुरक्षा दलाचे मनापासून आभार आणि कृतज्ञता व्यक्त करतात.

म. रेल्वेच्या मुंबई विभागात सर्वाधिक ३८१ सुटका केलेल्या मुलांची नोंदणी झाली असून त्यात २७० मुले आणि १११ मुलींचा समावेश आहे. पुणे विभागात १३६ सुटका केलेल्या मुलांची नोंदणी झाली. त्यात ९८ मुले आणि ३८ मुलींचा समावेश आहे. भुसावळ विभागात १३८, नागपूरात ५६, सोलापूरात ३४ मुला-मुलींचा समावेश आहे. गेल्या वर्षी म्हणजे २०२१ च्याजानेवारी ते डिसेंबरपर्यंत आरपीएफ, शासकीय रेल्वे पोलीस आणि इतर फ्रंटलाइन रेल्वे कर्मचा-यांच्या समन्वयाने ६०३ मुले आणि ३६८ मुलींसह ९७१ मुलांची सुटका केली होती.

समतोल फाउंडेशनची मोलाची कामगिरी

समतोल फाऊंडेशनच्या माध्यमातून आतापर्यन्त विविध कारणांनी घर सोडून पळून आलेल्या आणि फलाटावर राहणाऱ्या शेकडो मुलांचे यशस्वीपणे पुनर्वसन केले आहे. त्यांना संस्कार, शिक्षणाच्या माध्यमातून राष्ट्रीय प्रवाहात आणण्याचे काम समतोल फाऊंडेशनचे संस्थापक विजय जाधव आणि अध्यक्ष तथा आमदार संजय केळकर यांनी सांगितले.